साकीनाका येथील आगीत दोघांचा होरपळून मृत्यू

मृतांमध्ये एका महिलेचा समावेश 

Updated: Dec 28, 2019, 07:21 AM IST
साकीनाका येथील आगीत दोघांचा होरपळून मृत्यू   title=
साकीनाका येथील आगीत दोघांचा होरपळून मृत्यू

मुंबई : मुंबईतील साकिनाका येथे शुक्रवारी लागलेल्या आगीत दोघांचा  होरपळून मृत्यू झाला आहे. तर एक जण बेपत्ता आहे.. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. तब्बल ६ तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. घाटकोपरच्या वाहतूक कोंडीमुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. याबाबत वाहतूक पोलिस सहाय्यक आयुक्तांना विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीचं उत्तर दिल्याचं कळत आहे.  

साकीनाका भागातील ही पहिलीच घटना नाही. येथे अनेकदा अशा घटना घडतात. त्यासाठी अनधिकृत कारखाने जबाबदार असल्याचं काराण पुढे आलं आहे. दरम्यान या आग्नितांडवाची माहिती मिळताच रात्री उशीरा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या घटनास्थळी भेट दिली आणि पाहणी केली. यावेळी त्यांनी या भागातील अनधिकृत कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं. 

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही आग भडकली. ज्यानंतर लगेचच या भागातील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. साकीनाका खैराणी रोडवर असलेल्या आशापुरा कंपाउंडमध्ये ही आग लागली होती. या कंपाउंडमध्ये रसायनं, कपडे, भंगार तसेच रेडिमेड कपड्याचे तसेच लाकडी सामानाचे गोदाम आहेत.