अखेर मुहूर्त ठरला! सोमवारी दुपारी १२ वाजता मंत्रिमंडळाचा शपथविधी

हा शपथविधी सोहळा विधान भवनाच्या प्रांगणात पार पडणार आहे.

Updated: Dec 27, 2019, 10:03 PM IST
अखेर मुहूर्त ठरला! सोमवारी दुपारी १२ वाजता मंत्रिमंडळाचा शपथविधी title=

मुंबई: राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. त्यानुसार दुपारी १२ वाजता ठाकरे सरकारमधील नव्या मंत्र्यांना पदाची शपथ देण्यात येईल. आज सकाळीच ३० नोव्हेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, नक्की किती वाजता मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार, हे ठरले नव्हते. मात्र, आता ही शंकादेखील दूर झाली आहे. 

तत्पूर्वी आज सकाळीच विधान भवनातील कर्मचाऱ्यांना शपथविधीसंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. हा शपथविधी सोहळा विधान भवनाच्या प्रांगणात पार पडणार आहे. यावेळी एकूण ३६ मंत्री शपथ घेतील. 

मंत्रिमंडळ विस्तार : काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य, बाळासाहेब थोरातांवर फोडले खापर

यामध्ये शिवसेनेचे १३ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. त्यात १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ मंत्री शपथ घेणार आहेत. त्यात १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री शपथ घेणार घेतील. तर काँग्रेसचेही १० मंत्री शपथ घेणार असून यात ८ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

'जनतेनं राज्य दिलंय, किमान मंत्रिमंडळ तरी बनवा'

यापूर्वी २८ नोव्हेंबरला शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील प्रत्येकी दोन आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. तेव्हापासून संपूर्ण राज्याचे लक्ष मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याकडे लागले होते. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार यांच्याकडे गृहमंत्रीपद दिले जाणार का, हे पाहणेदेखील महत्वाचे ठरेल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबतही राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.