मुंबई : एसटीच्या ताफ्यात लवकरच 1200 शिवशाही बस दाखल होणार आहेत. या बस 2 ते 3 महिन्यांत दाखल होणार आहेत. या बस वातानुकूलित आहेत, त्यामध्ये आरामदायी आसने आणि एलईडी स्क्रिन बसविण्यात आल्या आहेत.
खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळाने विविध मार्गांवर अत्याधुनिक अशा शिवशाही बस सुरू केल्या आहेत.
वातानुकूलित बस, आकर्षक डिजिटल बोर्ड, पुशबॅक आरामदायी सीट, टू बाय टू आसनव्यवस्था, मोबाइल चार्जर, सीसीटीव्ही, अनाउन्समेन्ट सिस्टिम अशी या बसची वैशिष्ट्ये आहेत. या बसची आसनक्षमता 43 आहे. सध्या या बस मुंबई-कोल्हापूर, मुंबई-रत्नागिरी, पुणे-लातूर, पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर, रत्नागिरी-कोल्हापूर आणि मुंबई -अलिबाग मार्गावर सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी एसटीच्या ताफ्यात 16 शिवशाही बस दाखल झाल्या आहेत. उर्वरित बससाठी निविदा प्रक्रिया वेगाने सुरू आहे. दोन ते तीन महिन्यांमध्ये 1 हजार 200 शिवशाही बस दाखल होतील, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांनी दिली.
एसटी महामंडळाने खासगी प्रवासी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी वातानुकूलित बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे शिवशाही बसचा आराखडा तयार करण्यात आला आहे.