मुंबई : फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन सध्या सुरु असलेल्या वादात आता आमदार नितेश राणे यांनीही उडी घेतली आहे. फेरीवाल्यांच्या मारहाणीत जखमी झालेल्या मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांची नितेश राणे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
यावेळी आमदार नितेश राणे यांनी सुशांतच्या प्रकृती बाबत विचारपुस केली. तसेच ऑस्कर रुग्नालयाचे डॉक्टरांची भेट घेऊन सुशांतच्या प्रकृतीची माहिती घेतली.
मराठी विरुद्ध उत्तर भारतीय हा विषय नाहीये. संजय निरुपम राजकारण करत असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.
पोलीसांची परवानगी न घेता ते कशी काय सभा घेऊ शकतात? मुंबई ही मराठ्यांची आहे. मात्र, कांग्रेस पार्टीचे लोक झोपले आहेत का? असे प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केले.
संजय निरुपम उत्तर भारतीय मंच सुरू करत आहेत का, असा सवालही नितेश राणेंनी उपस्थित केला.
नितेश राणे यांनी पुढं म्हटलं की, "मी इथे एका मराठी माणसाला मारहाण झाली यासाठी त्याला बघायला आलोय. मालाडमध्ये अनधिकृत फेरीवाले जमतात आणि मारहाण करतात. अशा घटना परत घडल्या तर चारही बाजूकडून खळखटयाक होईल अशी धमकी फेरिवाल्यांना दिली. संजय निरुपम कांग्रेसचे अध्यक्ष आहेत. कांग्रेस पार्टी सर्वधर्म पार्टी आहे. स्वाताच अस्तित्व टिकवण्यासाठी संजय निरुपम प्रयत्न करत आहेत. या पुढे अशा घटना घटना घडल्या तर याद राखा, या पुढे मराठी माणसाला हात लावायचा नाही. हॉकर्स ची पॉलिसी काँग्रेसच्या आमदारांनी मांडावी, ते का नाही मांडत?"
निरुपम यांना कुणाकडून, किती हफ्ते जातात ते मला माहिती आहे. ते आपला वेगळा एजेंडा राबवत आहेत. निरुपम यांची दसरा, दिवाळी, आता क्रिसमस चांगला जाव यासाठी हफ्ते जमा करत आहेत असेही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
त्यानंतर संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत नितेश राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. "नितेश राणे कुठल्या पक्षात आहेत हे आधी त्यांनी ठरवावं. मी लहान मुलांच्या आरोपांकडे लक्ष देत नाही" असा टोलाही संजय निरुपम यांनी लगावला आहे.
त्यामुळे येत्या काळात हा वाद आणखीन चिघळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.