राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळावे - सुनील तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, असा सूर आता राष्ट्रवादीतून उमटू लागला आहे. मुख्यमंत्री पदासाठी संख्याबळ राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी मागणी आहे.

Updated: Nov 21, 2019, 03:46 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळावे - सुनील तटकरे title=
संग्रहित छाया

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, असा सूर आता राष्ट्रवादीतून उमटू लागला आहे. मुख्यमंत्री पदासाठी संख्याबळ राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी मागणी आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) निर्णय घेतील, असे वक्तव्य पक्षाचे सरचिटणीस आणि खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे.

महाविकासआघाडीची (Maha Vikas Aghadi) एकीकडे बोलणी सुरू असतनाच आता मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, असे मत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.  संख्याबळ आमचं आहे. पण पवारसाहेब अंतिम निर्णय घेतील, असंही तटकरे म्हणालेत. दरम्यान, अडीच वर्षे मुख्यमंत्री पदासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आग्रही आहेत, अशी माहिती पुढे येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान, काँग्रेसला (Congress) उपमुख्यमंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरातांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींची थोरातांच्या नावाला पसंती दिल्याचेही समजते आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना (Shiv Sena)  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्या नावाला आग्रह आहे. उद्धव यांच्यासाठी पवार, काँग्रेसचा आग्रह दिसून येत आहे, अशी खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 

दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेचा धडाका दिल्लीतही सुरूच ठेवला आहे. काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेबाबत काही अटी घातल्याच्या प्रश्नाला राऊतांनी उत्तर दिले आहे. देशाची राज्यघटनाच धर्मनिरपक्षे या शब्दावर आधारलेली आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेबाबत आम्हाला कोणी शिवकण्याची गरज नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. उद्या मुंबईत शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मुंबईत बैठक होणार असल्याचंही त्यांनी सांगितले. तसेच आज शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली. दरम्यान राज्यघटनेचं मूळ तत्व मान्य असणं स्वाभाविकच असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.