Sanjay Raut On Protest Against Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शुक्रवारी त्यांच्या गाडीसमोर सुपाऱ्या फेकून आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन शिवसैनिकांनी केल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर आज पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी खुलासा केला आहे. राज ठाकरेंच्या गाडीसमोर सुपारी फेकणारे सर्वजण आमचे कार्यकर्ते होते असं म्हणता येणार नाही. ही पक्षाची भूमिका नाही असं राऊत यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे आज म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी जालन्यामध्ये दाखल झाले असून हॉटेल अर्थवमध्ये ते मनसे पदाधिकाऱ्यांची चर्चा करत आहेत. जालन्यानंतर ते संभाजीनगरला जाणार आहेत. मात्र मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्यानंतर राज ठाकरेंच्या कार्यक्रमांना अतिरिक्त सुरक्षा पुरवली जात आहे. असं असतानाच शुक्रवारी बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकून आंदोलन करण्यात आलं. याचसंदर्भात संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता, राज ठाकरेंच्या गाडीवर सुपारीफेक करणारे उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते नव्हते. तसेच सुपारी फेकून आंदोलन करण्याची पक्षाची भूमिका नव्हती असं त्यांनी म्हटलं आहे. बीडमध्ये राज ठाकरेंच्या गाडीसमोर सुपाऱ्या फेकून आंदोलन करणारे शिवसैनिक असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावर बोलताना संजय राऊत यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे. आम्हाला धमक्या देऊ नका, भाजपाला द्या, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
"मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या गाडीवर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या. त्यात शिवसेनेच पदाधिकारी असू शकतात. पण पक्ष म्हणून त्या आंदोलनाशी शिवसेनेचा संबंध नाही. आमच्या माहितीप्रमाणे ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं आरक्षणासंदर्भात होतं. मी असं म्हणत नाही की त्यात आमचे कार्यकर्ते नव्हते. 100 टक्के असतील. पण ते आंदोलन पक्षाचं नव्हतं. ती पक्षाची भूमिका नव्हती," असं राऊत म्हणाले.
तसेच या प्रकरणानंतर मनसेच्या काही नेत्यांनी संजय राऊतांबरोबरच शिवसेनेला इशारा दिल्यानंतर राऊत यांनी यावरुनही मनसेला टोला लगावला आहे. 'आम्हाला धमक्या देऊ नका. ते भाजपाला द्या. फडणवीसांना द्या. महाराष्ट्राद्रोऱ्यांना द्या. मी माझी भूमिका. पक्षाची भूमिका, शिवसेना पक्षप्रमुखांची भूमिका सांगतोय," असं राऊत म्हणाले.