जळगाव: विरोधकांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करू दाखवावे, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. ते रविवारी जळगाव येथील भाजपच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी मोदींनी महाराष्ट्रातील जनतेला साद घालण्यासाठी पुन्हा एकदा अनुच्छेद ३७० चा राग आळवला. त्यांनी म्हटले की, ५ ऑगस्टला भाजपने ऐतिहासिक असा निर्णय घेऊन दाखवला. त्यापूर्वी काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करणे, ही अशक्यप्राय गोष्ट वाटायची. मात्र, भाजपने ते धाडस दाखवले. परंतु, ही गोष्ट विरोधकांना रुचलेली नाही.
हे लोक पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. ३७० सारख्या राष्ट्रहिताच्या निर्णयावरून विरोधक राजकारण करत आहेत. अनुच्छेद ३७० रद्द झाल्याचा इतकाच त्रास होत असेल तर विरोधकांनी यंदाच्या निवडणुकीत तशी स्पष्ट भूमिका घ्यावी. मी तुम्हाला आव्हान देतो की, तुम्ही निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० पुन्हा आणू, असे आश्वासन द्यावे. अन्यथा मगरीचे अश्रू ढाळणे बंद करावे, असे मोदींनी म्हटले.
खरा पैलवान कोण याचा फैसला २४ तारखेला जनताच करेल - फडणवीस
विरोधक उलटसूलट चर्चा करून लोकांना केवळ मूर्ख बनवू पाहत आहेत. विरोधकांनी अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करण्याचा प्रयत्न केला तर देशातली जनता त्यांना तसं करू देईल का? या देशात विरोधकांचे राजकीय भवितव्य उरेल का?, असा सवाल मोदींनी विचारला.
याशिवाय, आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी फडणवीस सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले. आता जनतेने पुन्हा सत्ता दिल्यास भाजप उर्वरित कामेही पूर्ण करेल, असे मोदींनी सांगितले.