सर्वेक्षणांचे निकाल काहीही येवोत, २०१९ ला आमचीच सत्ता- पंकजा मुंडे

भगवान बाबांच्या नावाने नवे संस्थान उभारले

Updated: Oct 18, 2018, 04:55 PM IST
सर्वेक्षणांचे निकाल काहीही येवोत, २०१९ ला आमचीच सत्ता- पंकजा मुंडे title=

बीड: आगामी निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात भाजपला मोठा फटका बसेल, असे अनेक सर्वेक्षण निकाल सध्या पहायला मिळत आहेत. मात्र, असल्या सर्वेक्षणांनी काहीही होणार नाही. २०१९ मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपच पुन्हा सत्तेवर येईल, असा दावा राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. त्या गुरुवारी बीडच्या सावरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात बोलत होत्या. 

यावेळी त्यांनी उसतोड कामगार महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करत स्थानिक जनतेला भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत या महामंडळाची स्थापना होईल. तसेच या महामंडळासाठी १०० कोटींची तरतूद करण्याचे आश्वासनही पंकजा मुंडे यांनी दिले. 

पंकजा मुंडे आणि महंत नामदेवशास्त्री यांच्यातील वादामुळे भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झाली होती. कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून पोलिसांनीही पंकजा यांना भगवान गडावर मेळाव घेण्यास मनाई केली होती. 

त्यामुळेच पंकजा यांनी बीड जिल्ह्यात भगवान बाबांच्या नावाने नवे संस्थान उभारले आहे. भगवान बाबा नगर जिल्ह्यातून सीमोल्लघंन करत बीडमध्ये दाखल झाले, असे पंकजा यांनी भाषणादरम्यान सांगितले. 

याठिकाणी भगवान बाबांच्या २५ फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या मेळाव्याला बीड जिल्ह्यातल्या भाजप आमदारांसह दुग्धविकासमंत्री महादेव जानकरांनीही उपस्थिती लावली होती.