पाण्याच्या शोधात असलेली २५ माकडं विहिरीत पडली

Updated: May 21, 2018, 09:10 PM IST

यवतमाळ : अल्प पर्जन्यमानामुळे यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झालीय. या दुष्काळी स्थितीचा फटका नागरिकांबरोबरच वन्यप्राणी आणि पक्षांनाही बसतोय. पाण्याच्या शोधात २५ माकडं विहिरीमध्ये पडल्याची घटना नेर तालुक्यातल्या जवळगावात घडली.

सुदैवानं वनविभागाच्या बचाव पथकानं शर्थीचे प्रयत्न करून सर्व माकडांना सुखरूप बाहेर काढलंय. जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिक आंदोलन करत असले तरी मुक्या जीवांनी कुणाला पाणी मागावं अशी स्थिती आहे.

जवळगाव परिसरात पाण्याचा शोध घेत माकडं आली  आणि विहिरींमध्ये पाणी पिण्यासाठी उतरले. त्यातील २५ माकडं ३ वेगवेगळ्या विहिरींमध्ये पडली.

शेतमालकांना माकडांचा आवाज आल्यानं त्यांनी विहिरीकडे धाव घेतली. गावकऱ्यांनी आणि नेर वनविभागाच्या पथकानं माहिती मिळताच बचाव कार्य करून विहिरीतील २५ माकडं बाहेर काढून त्यांची सुटका केली.