आशिष अम्बाडे, झी मीडिया ,चंद्रपूर : ही बातमी आहे जंगलातून.... वन्यजीव अभ्यासकांची नवी पिढी घडावी, म्हणून एक विशेष उपक्रम हाती घेण्यात आलाय.
चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत ब-याच आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वन्यजीवप्रेमी आणि अभ्यासकांची नवी पिढी घडविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय. त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात घनदाट जंगलात वसलेल्या जानाळा आणि केळझर गावातल्या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना निसर्द अनुभवण्याची संधी देण्यात आली. या मुलांसाठी जंगलाच एक बेस कॅम्प तयार करण्यात आला. मग जंगलात पायी भ्रमंती सुरू झाली. त्यासाठी विद्यार्थ्यांना 'संदर्भ पुस्तिका देण्यात आली होती. य़ा निसर्ग अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांना जंगलातले वृक्ष, औषधी वृक्ष, वन्यजीवांची माहिती, त्यांचे ठसे कसे ओळखायची अशी सगळी माहिती देण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यातलं मुल-चिचपल्ली हे जंगल ताडोबा-अंधारी व्याघ्र परिघाचा विस्तारित भाग. उत्तम जलव्यवस्थापनामुळे या जंगलात मुबलक पाणी आहे... छोटे वन्यजीव , वृक्ष -वेली यांची श्रीमंती या जंगलात आहे.... बच्चे कंपनीच्या या सफरीत त्यांना हरणांचे आणि वाघांचे ठसेही दाखवण्यात आले.
सहलीची ही रचना खास वनव्याप्त क्षेत्रातील मुलांना अधिक संवेदनशील बनविण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. ही सगळी मुलं तशी जंगलाशी आधीच परिचित आहेत.... पण त्यांना रोजच्या जगण्यातलं जंगलाचं महत्त्व, निसर्ग संवर्धन केल्यानं होणारे फायदे, पाणी वाचवण्याची गरज, मानव-वन्यजीव संघर्षात घेण्याची काळजी याबाबत या निसर्ग अभ्यासात माहिती देण्यात आली.
विदर्भात वनविभागाच्या वतीने सर्वच वनपरिक्षेत्रात असा 'निसर्गानुभव ' उपक्रम राबविला जाणार आहे. या पैकी प्रत्येक कॅम्पमधून २ अभ्यासू विद्यार्थी या पुढच्या टप्प्यातल्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवडले जाणार आहेत. राज्यात वन्यजीवप्रेमींची , निसर्ग अभ्यासकांची आणि संवेदनशील संवर्धकांची नवी पिढी घडविण्यासाठी वन्यजीव तज्ज्ञ आणि वनविभाग करत असलेले प्रयत्न जंगल रक्षणाचा भविष्यकाळ ठरणार आहे.