खेड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून त्यांची चौकशी केली. युवसेना अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 'सिल्वर ओक' गाठत पवारांची भेट घेतली.
आज सकाळी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनीही शरद पवार यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यापूर्वी संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाली तेव्हा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली होती.
शिवसेना आणि राष्ट्रवादीचे असे सूत जुळलेले असतानाच खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी मोठं विधान केलंय. खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथून पुणे-नाशिक महामार्गावरुन राजगुरुनगर पोलिस ठाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावेळी आमदार मोहिते बोलत होते.
महाविकास आघाडी सरकार चालविण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला अस्थिर करण्यासाठी हा हल्ला घडवून आणला आहे. ज्या विषयाशी शरद पवारांचा संबंध नाही. जो विषय पवार हाताळत नाही, त्यासाठी जाणीवपूर्वक हल्ला घडवून आणण्यामागे काही लोकांचा विशिष्ट हेतू आहे, असे ते म्हणालेत.
राज्याचे परिवहन खातं शिवसेनेच्या अनिल परब यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे, मग तुम्हाला जे काय करायचे, ते ज्याच्याकडे खातं आहे, तिकडे करायचे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हा राज्याचा प्रश्न होता. तुम्हाला मोर्चा आणि हल्लाच करायचा होता, 'तर मातोश्री वर करायचा', मग तुम्हाला कळलं असतं, हल्ल्याची किंमत काय मोजायला लागली असती,’ अशा शब्दांत आमदार दिलीप मोहिते यांनी हल्लेखोर आणि त्यामागे असणाऱ्या शक्तीचा समाचार घेतला.