कोण आहेत करुणा शर्मा? कोणी ठेवलं गाडीत पिस्तूल? प्रकरणाचं गूढ कायम

धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित असलेल्या करुणा शर्मा यांना परळीत अटक करण्यात आली, नेमकं काय झालं 'त्या' दिवशी परळीत?

Updated: Sep 7, 2021, 06:11 PM IST
कोण आहेत करुणा शर्मा? कोणी ठेवलं गाडीत पिस्तूल? प्रकरणाचं गूढ कायम title=

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : परळी शहरात गेल्या दोन दिवसांपासून करुणा शर्मा (Karuna Sharma) प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या नाट्यमय घडामोडींनी अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याशी नाव जोडलं गेलेल्या करुणा शर्मा यांनी दोन दिवसांपूर्वी  फेसबुक लाईव्ह करत मी परळीमध्ये येणार आहे तसंच पत्रकार परिषद घेऊन सर्व काही सांगणार आहे, असं सांगितल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

परळीत नेमकं काय घडलं?

करुणा शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर लाईव्ह करत आपण परळीला येणार असल्याचं जाहीर केलं. जाहीर केल्याप्रमाणे करुणा शर्मा या परळी शहरामध्ये प्रभू वैद्यनाथ मंदिरासमोर सांगितलेल्या वेळेपेक्षा दोन तास उशिरा पोहोचल्या. 

करुणा शर्मा सिद्धनाथ मंदिरासमोर पोहोचताच अनेक महिलांनी त्यांना गराडा घातला. करुणा शर्मा गाडीतून उतरताच महिला आक्रमक झाल्या. यावेळी महिलांमध्ये आणि करुणा शर्मा यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. करुणा शर्मा येणार असल्यामुळे पोलिसांनी परळी शहरांत मोठा बंदोबस्त परळी शहरासह मंदिर परिसरामध्ये तैनात केला होता. तणावाचं वातावरण निर्माण होईल अशी कुणकुण पोलिसांना आधीच लागलेली असावी. 

करुणा शर्मा आणि महिलांमध्ये शाब्दिक चकमक

करुणा शर्मा यांनी प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दर्शन करण्याअगोदरच महिलांमध्ये आणि करुणा शर्मा यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचं पाहून पोलिसांनी त्या ठिकाणांवरून करुणा शर्मा यांना गाडीत बसवलं. करुणा शर्मा तिथून निघाल्या. मात्र काही वेळातच त्या परळीच्या शहर पोलीस स्थानकामध्ये असल्याची माहिती मिळाली. करुणा शर्मा यांच्यासोबत आलेला एक व्यक्ती त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर हे पोलीस स्थानकांमध्ये उपस्थित होते.

जातीवाचक शिवीगाळ आणि चाकूहल्ला

वैद्यनाथ मंदिरासमोर जमावाने त्यांना रोखलं त्यावेळी करुणा शर्मा यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप एका महिलेने केला. त्याचवेळी त्यांच्याबरोबर असलेल्या अरुण मोरे याने एका महिलेवर चाकूहल्ला केला. याप्रकरणी करुणा शर्मा आणि अरुण मोरे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

व्हायरल व्हिडिओची पडताळणी

करुणा शर्मा मंदिरासमोर जात असताना त्यावेळेची एक व्हिडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली. या व्हिडिओ क्लिप मध्ये करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये संशयास्पद व्यक्ती काहीतरी टाकत असल्याचं समोर आलं. ही वस्तू पिस्तूल असल्याचं बोललं जात आहे. याची पडताळणी पोलीस करत आहेत. करुणा शर्मा यांना आणि त्यांच्या ड्रायव्हरला त्यादिवशी सातच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं जाहीर केलं आणि दोघांवरती ही गुन्हे दाखल करण्यात आले. पिस्तुल त्या सोबत घेऊन आल्या होत्या की ते त्यांच्या कारमध्ये कुणी ठेवलं? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

ती संशयीत व्यक्ती कोण?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तोंड झाकलेली महिला, डिक्कीत काहीतरी ठेवताना दिसते. आणि महत्त्वाचं म्हणजे ही व्यक्ती डिक्कीत काहीतरी ठेवत असताना तिच्या बाजूला एक पोलिस अधिकारीही असल्याचं दिसतं आहे. या व्यक्तीने ओळखू येऊ नये यासाठी संपूर्ण चेहरा स्कार्फने झाकलेला आहे. डोळ्यावर गॉगल चढवलेला आहे. 

करुणा शर्मा यांनी आरोप फेटाळले

दरम्यान, करुणा शर्मा यांना वैद्यकीय तपासणीसाठी बाहेर काढण्यात आलं त्यावेळी करुणा शर्मा यांनी आपल्या गाडीत आढळलेलं पिस्तूल आपलं नसून आपल्याला फसवलं जात असल्याचा आरोपही यावेळी केला.

करुणा शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी

या सर्व प्रकारानंतर परळी शहराच्या पोलीस स्थानकावर लोकांनी गराडा घालत करुणा शर्मा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गुन्हा दाखल झाल्यामुळे करुणा शर्मा यांना रात्र पोलीस स्थानकातच काढावी लागली. दुसऱ्या दिवशी करुणा शर्मा आणि अरुण मोरे यांना आंबेजोगाईच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. करुणा शर्मा यांना अंबाजोगाई सत्र न्यायालयाने न्यायलयीन कोठडी सुनावली. तर त्यांच्या सोबत असणाऱ्या ड्रायव्हरला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.  

कोण आहेत करुणा शर्मा

करुणा शर्मा हे नाव महाराष्ट्रात सर्वांत पहिल्यांदा चर्चेत आलं जानेवारी 2021 मध्ये. करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा हिने मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर करुणा आणि धनंजय मुंडे यांच्यामधील संबंध समोर आले. याला धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुष्टी दिली. तसंच करुणा यांच्यापासून दोन अपत्ये असल्याचं जाहीर केलं होतं.