पत्नी मला साथ देत नाही! चिठ्ठी लिहित तलाठी पतीने केली डॉक्टर पत्नीची हत्या

हत्येच्या एक दिवस आधीच नविन घराची वास्तुशांती करत गृहप्रवेश केला, पण तोच शेवटचा दिवस ठरला

Updated: Sep 7, 2021, 04:39 PM IST
पत्नी मला साथ देत नाही! चिठ्ठी लिहित तलाठी पतीने केली डॉक्टर पत्नीची हत्या title=

पिंपरी-चिंचवड : केवळ संशयावरुन डॉक्टर पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. विजयकुमार साळवे असं आरोपीचं नावन असून तो तलाठी असून जुन्नर तालुक्यातील आळेगावमध्ये कार्यरत होता. तर सरला विजय साळवे असं मृत महिलेचं नाव आहे. 

अनैतिक संबंधांचा संशय

सरला साळवे या पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या शिवाय मोशीत त्या खाजगी रुग्णालयही चालवत होत्या. नायडू हॉस्पीटलमधल्या डॉक्टरशी पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय विजयकुमार होता. केवळ या संशयावरुनच विजयकुमारने पत्नी सरलाची हत्या केली.

नविन घरातला गृहप्रवेश ठरला शेवटचा

विजयकुमार आणि सरला यांनी नुकताच मोशीमध्ये फ्लॅट घेतला होता. या नवीन फ्लॅटची शनिवारी वास्तूशांती केली. त्यानंतर दोघंही फ्लॅट मध्ये मुक्कामी होते. रविवारी दोघांचे फोन बंद होते. त्यामुळे नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केली. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी केली फ्लॅटचं कुलूप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. 

घरात डॉक्टर सरला यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळला. मृतदेहाशेजारी लोखंडी हातोडा आणि चाकू देखील आढळून आला. तर फरार होण्यापूर्वी पतीने लिहलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली. पत्नी मला साथ देत नसल्याचं यात लिहलं असल्याचं पोलिसांची माहिती आहे. याप्रकरणी एम आय डी सी भोसरी पोलिस अधिक तपास करत आहेत.