Fadtus Words Mean: राज्यातील राजकारण आता फडतूस या शब्दावरुन तापण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विद्यमान उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना फडतूस हा शब्द वापरला. ठाण्यातील पत्रकार परिषदेत ठाकरेंनी वापरलेल्या या शब्दाला नागपूर विमानतळावरुन फडणवीसांनी उत्तर देताना फडतूस कोण आहे हे राज्याच्या जनतेनं अडीच वर्षांच्या कार्यकाळात पाहिलं आहे, असा टोला ठाकरेंना लगावला. या टीकेवरुन येत्या काही दिवसांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र असं असताना फडतूस या शब्दाचा नेमका अर्थ काय तुम्हाला ठाऊक आहे का? नेमकं घडलं काय आणि फडसूतचा अर्थ काय आहे हे जाणून घेऊयात.
ठाण्यामधील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाण प्रकरणानंतर उद्धव ठाकरे हे कुटुंबियांसहीत ठाण्यातील संपदा रुग्णालयामध्ये जाऊन रोशनी शिंदेंना भेटले. रोशनी यांच्या प्रकृतीची चौकशी केल्यानंतर ठाकरेंनी ठाण्याच्या पोलिस आयुक्तांची भेट घेऊन दोषींवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली. आपल्या राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला आहे असं ठाकरे म्हणाले. जबाबदारी स्वीकारुन फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही ठाकरेंनी केली.
दरम्यान, या टीकेनंतर नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांनी फडणवीसांना या टीकेबद्दल विचारलं असता. "अडीच वर्षांमध्ये घरुन काम करणाऱ्यांनी, ज्यांच्या काळात पोलिसांवर हफ्ते वसुलीचे आरोप झाले त्यांना आमच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. फडतूस कोण आहे हे अडीच वर्षांच्या कार्यकाळात संपूर्ण राज्याने पाहिलं आहे. मी गृहमंत्रीपद सोडावं यासाठी अनेकजण देव पाण्यात ठेवून बसले आहेत. मात्र मी गृहमंत्रीपद सोडणार नाही. जो जो चुकीचं काम करेल त्याला मी जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही," असं फडणवीस म्हणाले.
ठाकरे आणि फडणवीसांनी एकमेकांवर फडतूस शब्दांवरुन टीका केली असतानाच या शब्दाचा नेमका अर्थ काय हे तुम्हाला ठाऊक आहे का? या शब्दाचा अर्थ आम्ही तुम्हाला सविस्तर समजावून सांगतो. अतिशय टाकाऊ , क्षुल्लक अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो. मात्र फार महत्त्वाची नसलेली किंवा टाकाऊ गोष्टीसाठी ‘फडतूूस’ हा शब्द का वापरला जातो? या शब्दाची उत्पत्ती नेमकी कशी झाली? तर या शब्दाच्या उत्पत्तीचा संबंध शेतीशी आहे.
सामान्यपणे फड म्हटल्यावर अनेकांना तमाशाचा किंवा गप्पांचा फड आठवतो. मात्र शेतीसंदर्भातही हा शब्द वापरला जातो. धान्य साठवण्याच्या शेतातील ज्या खुल्या जागेवर (ओपन स्पेस) तोडणी करुन आणलेल्या कणसांचा किंवा धान्याचा ढीग ठेवला जातो त्याला 'फड' असं म्हणतात. शेतातून काढलेलं हे धान्य सालासकट असते. धान्यावरील या सालाला ‘तूस’ असं म्हणतात. धान्य स्वच्छ करताना हा फड म्हणजेच ढीग उडवला जातो म्हणजेच उफणणी केली जाते. पाटी भरुन धान्य उंचावर पकडून पाटी हलवत ते खाली टाकले जाते. त्यावेळी वाऱ्याने धान्य एका बाजूला आणि धान्यावरील सालं किंवा चिकटलेले तूस, फोलपट जे वजनाने धान्याच्या दाण्याच्या तुलनेनं हलके असतात ते उडून दुसऱ्या बाजूला पडतात. त्यानंतर या तुसांचा, फोलपटांचादेखील ढीग म्हणजेच ‘फड’ तयार होतो. अर्थातच उरलेल्या, उडालेल्या सालपाटांचा हा ढीग टाकाऊ असतो. या ढीगाचा काहीही उपयोग नसतो. म्हणजेच धान्याप्रमाणे याचं सेवन केलं जात नाही. याच टाकाऊ तुसांचा म्हणजेच सालपाटांचा फड (ढीग) म्हणजे फडतूस. हा ढीगारा कामाचा नसल्याने निरुपयोगी वस्तूला समानार्थी शब्द म्हणून फडतूस हा शब्द वापरला जातो.