संपूर्ण महाराष्ट्रात यलो अलर्ट! मुंबईसहीत 'या' जिल्ह्यांत मुसळधार कोसळणार; आठवडाभर..

Maharashtra On Yellow Alert Heavy Rain In Mumbai Vidharbha: मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये आज मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 23, 2024, 06:40 AM IST
संपूर्ण महाराष्ट्रात यलो अलर्ट! मुंबईसहीत 'या' जिल्ह्यांत मुसळधार कोसळणार; आठवडाभर.. title=
संपूर्ण महाराष्ट्रात यलो अलर्ट

Maharashtra On Yellow Alert Heavy Rain In Mumbai Vidharbha: हवामान विभागाने  महाराष्ट्रामध्ये आजपासून मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आज (23 सप्टेंबर) मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मुंबईबरोबरच पालघर, ठाणे या जिल्ह्यामध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. आजपासून पुढील काही दिवस ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. राज्याभरामध्ये या आठवड्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह दमदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. 

मुंबईत ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहणार

मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे. या कालावधीत काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये आज मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यभर यलो अलर्ट जारी

वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्यामुळे नुकसानीची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोमवारी राज्यभराला पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सोलापूर, बीड, नगर, नांदेड, हिंगोली, परभणी, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

विदर्भात सगळीकडे मेघगर्जनेसह पाऊस

धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भामधील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल असे हवामान विभागाने सांगितले आहे.

मुंबईकरांना उकाड्यापासून सुटका

दरम्यान, वातावरणात वाढलेली आर्द्रता आणि मुंबईत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. मागील दोन दिवस कमाल तापमानातही वाढ झाली आहे. मात्र, आता पुढील आठवड्यात अपेक्षित पावसानंतर तापमानात काही अंशी घसरण होण्याची आणि उकाड्यापासून काहिसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

शेतीचं नुकसान होणार

राज्यभरात खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. ऐन सुगीत पाऊस पडणार असल्यामुळे हा पाऊस मोठा नुकसानकारक ठरणार आहे. खरिपातील शेतीमालाला आजपासून सुरु होणाऱ्या पावसाचा मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.