लातूरकरांवर पुन्हा पाणीटंचाईचं संकट

पुन्हा एकदा रेल्वेने पाणीपुरवठा?  

Updated: Jul 21, 2019, 07:30 PM IST
लातूरकरांवर पुन्हा पाणीटंचाईचं संकट title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : पावसाने ओढ दिल्याने लातूरवर जलसंकट ओढावले आहे. पाऊस आला तरंच लातूरकरांची तहान भागणार असून अन्यथा पुन्हा एकदा रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ लातूरवर येते का काय अशी भीती वाटू लागली आहे.

दीड महिना उलटून गेला तरी अद्याप म्हणावा तसा पाऊस न पडल्यामुळे लातूर शहरावर पुन्हा एकदा जलसंकट घोंगावू लागले आहे. कारण मांजरा धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस अधिकच कमी होऊ लागली आहे. लातूरला १० दिवसाआड प्रमाणेच पाणी पुरवठा झाला तर ऑगस्ट अखेरपर्यंत पुरेल इतकंच पाणी मांजरा धरणात शिल्लक आहे. त्यामुळे २०१६ प्रमाणेच रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ लातूरवर येते का काय अशी भीती लातूरकरांना वाटू लागली आहे.

लातूर महानगरपालिका सध्या भाजपाच्या ताब्यात असून महापौर सुरेश पवार यांनी रेल्वेने पाणी पुरवठा होईल का? या प्रश्नाला बगल देत अजूनही चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी लातूरच्या या परिस्थितीला भाजपा सरकारच दोषी असल्याचे म्हटले आहे. 

२०१६च्या दुष्काळानंतर झालेल्या पावसाळयात आणि २०१७च्या पावसाळ्यात सलग दोन वर्षे मांजरा धरण १०० टक्के भरले होते. मात्र धरण भरल्यानंतरही धरण्यातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. यावर त्यावेळी झी २४ तासने प्रकाशही टाकला होता. मात्र त्यानंतरही दोषींवर कारवाई झाली नाही. २०१६-२०१७ मध्येच धरण भरल्यानंतर पाण्याचा योग्य विनियोग केला असता तर लातूरवर पाण्याचं संकट ओढावलं नसतं. आता वरुणराजा बरसला तरच लातूरकरांची तहान भागू शकते.