कोरोना काळात राज्य सरकारने एवढे निर्णय फिरवले

कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये राज्य सरकराने घेतलेले अनेक निर्णय फिरवल्यामुळे गोंधळाचं चित्र पाहायला मिळत आहे.

Updated: May 10, 2020, 05:36 PM IST
कोरोना काळात राज्य सरकारने एवढे निर्णय फिरवले title=

मुंबई : कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये राज्य सरकराने घेतलेले अनेक निर्णय फिरवल्यामुळे गोंधळाचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यभरातील प्रवासासाठी एसटी सेवा मोफत असेल. त्यासाठी ११ मे पासून बुकिंग सुरु होईल, असे सांगितले गेले. मात्र, काही तासांतच सरकारने घुमजाव करत हा निर्णय फिरवला.  एवढेच नव्हे तर परिवहन मंत्र्यांनाच अंधारात ठेवून हा निर्णय परस्पर बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना काळात निर्णय फिरवण्याची ही काही पहिली वेळ नाही, याआधाही अनेक निर्णय फिरवण्याची नामुष्की सरकारवर ओढावली होती.

सरकारने फिरवलेले निर्णय

- ३ मेच्या लॉकडाऊननंतर सगळी एकल दुकानं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये दारूच्या दुकानांचाही समावेश होता, पण नंतर मुंबईतील रेड झोनमधील दारू दुकानांसह सगळी एकल दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

- मुंबईमध्ये यानंतर हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक दुकानं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

- रेड झोनमधून कर्मचाऱ्यांची उपस्थिती आधी ५ टक्क्यांवरून १० टक्के करण्यात आली. यानंतर हा निर्णयही फिरवून उपस्थिती पुन्हा ५ टक्के करण्यात आली. 

- कर्मचाऱ्यांच्या पगारात आधी कपातीचा निर्णय घेण्यात आला, यानंतर निर्णय न झाल्याचं स्पष्टीकरण सरकारला द्यावं लागलं.

- शासकीय कर्मचाऱ्यांना पगार दोन टप्प्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुन्हा एप्रिलपासून एका टप्प्यात पगार देण्याचा आदेश देण्यात आला.

- वर्तमानपत्र घरपोच पोहोचवण्याला सुरुवातीला मनाई करण्यात आली. पण टीका झाल्यानंतर रेड झोन वगळता इतरत्र घरपोच सेवा सुरू करण्यात आली. 

शिवसेनेकडून 'बातमी' लिक झाल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी