साताऱ्यात जीप ३०० फूट खोल दरीत कोसळली, तिघांचा मृत्यू

पौर्णिमा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती.

Updated: Dec 22, 2018, 03:08 PM IST
साताऱ्यात जीप ३०० फूट खोल दरीत कोसळली, तिघांचा मृत्यू title=

सातारा: साताऱ्यात शनिवारी झालेल्या अपघातात एक जीप ३०० फूट खोल दरीत कोसळली. या दु्र्घटनेत तिघांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण भोजलिंगाचे दर्शन घेऊन परतत होते. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळली. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. सिंधू धोंडिबा गळवे  (सांगली), मनिषा आटपाडकर, कंठेमाला कलास आटपाडकर (सांगली) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील डोंगरावर भोजलिंगचे देवस्थान आहे. शनिवारी पौर्णिमा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती.

यावेळी आटपाडी तालुक्यातील विटलापूरहून जीपने १३ भाविक भोजलिंग डोंगरावर दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर हे सर्वजण जीपने पुन्हा आपापल्या गावी निघाले होते. डोंगरावरून खाली येत असताना अचानक जीपचे चाक घसरले. या घाटामध्ये संरक्षक कठडे नसल्यामुळे जीप थेट ३०० फूट दरीत जाऊन कोसळली. 

या जीपचे हूड उघडे असल्यामुळे इतर प्रवासी जीपमधून बाहेर फेकले गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी टळली. या अपघाताची माहिती मिळताच वरकुटे मलवडी आणि परिसरातील नागरिकांनी तसेच डोंगरावर जाणा-या नागरिकांनी दरीत उतरून जखमींना बाहेर काढले. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी म्हसवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.