औरंगाबाद : लेनिनचा पुतळा पाडल्यानंतर देशभरात पुतळ्याचं राजकारण नव्याने सुरु झालंय. त्यातच औरंगाबादमध्ये सावरकरांच्या पुतळ्याला काळे फासल्याने त्याचे पडसाद उमटू लागलेत. पाहूयात औरंगाबादचे असुरक्षित पुतळे.
गेल्या आठवड्यात औरंगाबादमध्ये सावरकरांच्या पुतळ्याची कुणी समाजकंटकानं विटंबना केली आणि त्यानंतर सुरु झाल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी. रास्तारोको झाला अन् निषेधही.. मात्र पुतळ्यांच्या सुरक्षेबाबत कुणीही काहीही बोललं नाही. औरंगाबाद पालिकेच्या हद्दीत जवळपास दीडशेहून अधिक पुतळे आहेत. त्यातील काही मोजक्या पुतळ्यांच्या सुरक्षेची पाहणी झी मीडियाने केली. त्यावेळी पुतळ्यांजवळ कुठलीही सुरक्षा नाही किंवा साधे सीसीटीव्हीही बसवले नसल्याचे आढळले.
काही ठिकाणी सीसीटीव्ही असले तरी ते बंद अवस्थेत आहेत. अशात कुणीतरी समाजकंटक पुतळ्याची विटंबना करतो आणि त्यानंतर उसळणा-या आगडोंबातून नुकसान होतं ते सामान्यांचंच. त्यामुळे किमान सीसीटीव्ही कॅमेरे तरी असावेत अशी मागणी होतेय.
या सगळ्यांबाबत पुतळ्यांची पालक असलेली पालिकाही झोपलीय. आता घटना झाल्यानंतर आणि झी मीडियाने विषय मांडल्यानंतर पालिकेने कारवाई सुरु केलीय.
सीसीटीव्ही, गस्तीपथकं अशा गोष्टी असल्या तर निश्चितच फरक पडेल. मात्र या यंत्रणा सुरु राहणं गरजेचं आहे. सावरकर पुतळ्याजवळ सीसीटीव्ही होता मात्र तो बंद होता. त्यामुळं त्या समाजकंटकांना अजूनही जेरबंद करण्यात आलेले नाही. त्यामुळं याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.