Pune Bypoll Election: गिरीश बापट यांच्या नाकात ऑक्सिजनच्या नळ्या घालून...; उद्धव ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य

Pune Bypoll Election:  कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या (Kasba Chinchwad By Election) निमित्ताने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ऑनलाइन माध्यमातून आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी टिळक घराणं आणि गिरीश बापट यांचा उल्लेख करत भाजपावर हल्लाबोल केला.   

Updated: Feb 24, 2023, 12:53 PM IST
Pune Bypoll Election: गिरीश बापट यांच्या नाकात ऑक्सिजनच्या नळ्या घालून...; उद्धव ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य title=

Uddhav Thackeray By Election: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या (Kasba Chinchwad By Election) निमित्ताने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करताना ही निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी करणाऱ्यांनाही सुनावलं. दरम्यान यावेळी त्यांनी भाजपा (BJP) आजारी असताना गिरीश बापट (Girish Bapat) यांना प्रचारात उतरवलं असल्याचा आरोप केला. 

"पोटनिवडणूक अशापद्दतीने लढवावी लागेल असं वाटलं नव्हतं. राजकारणात निवडणूक जिंकणं आणि ती जिंकण्याची ईष्या असणं काही नवीन नाही. आपल्या विरोधकावर मात करण्याची जिद्द बाळगावी लागते. पण आपला विरोधक अशा पद्दतीने निघून जावा अशी कोणाची इच्छा नसते. लक्ष्मणराव आणि मुक्ताताई यांना मी श्रद्धांजली वाहतो. ते माझे विधीमंडळातील सहकारी होते," असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. 

पुढे ते म्हणाले की "पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती असं काहींचं म्हणणं आहे. मी त्यांच्या भावनेचा आदर करतो. पण निवडणूक बिनविरोध करताना लोकशाहीतील मोकळेपणा राहिला आहे का? निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातील व्यक्तीलाच उमेदवारी दिल्याने निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती असं ज्यांना वाटत आहे, तर मग लोकमान्यांच्या घरातील व्यक्तीला दुर्लक्षित केलं तेव्हा सहानुभूती कुठे गेली. तिथे तर टिळकांचं घराणं वापरुन सोडून दिलं". 

"गिरीश बापट यांच्याबद्दल मला वाईट वाटलं आणि अगदी जीव तळमळला. भाजपात असले तरी गिरीश बापट यांच्या उमेदीचा काळ मी पाहिला आहे. शिवसेनाप्रमुख जेव्हा पुण्यात यायचे तेव्हा गिरीश बापट चर्चेसाठी यायचे. प्रचाराच्या सभेलाही शिवसेनाप्रमुख हजर राहिले असावेत. टिळकांच्या कटुंबातील कोणालाही उमेदवारी न देता उमेदवारी बदलण्यात आली. त्यात क्रूरतेचा कळस म्हणजे गिरीश बापट गंभीर आजारी असतानाही हा प्रचाराला उतवरणं हा अमानुषपणा आहे. मी त्यांचे ऑक्सिजनच्या नळ्या नाकात घालूनही प्रचाराला उतरलं असल्याचे फोटो पाहिले. ही कोणती लोकशाही मानायची. अशाप्रकारे लोकांचा वापर करायचा आणि नंतर फेकून द्यायचं. आणि अशा पक्षाला मतदान करायचं," असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. 

"कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत शिवसैनिक काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदान करणार का असा अपप्रचार करण्यात आला. हो करणार....25-30 वर्ष भाजपाला केलं नव्हतं का? ज्याप्रमाणे त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आमच्याशी वागलं, त्यापेक्षाही भयानक, निर्घृणपणे भाजपा आमच्याशी वागत असेल तर मी तमाम शिवसेनाप्रेमी नागरिक, शिवसैनिकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे जे शिवसेनेला मुळसकट उखडायला निघाले आहेत अशा भाजपाला मदत होता कामा नये. जर मदत झाली तर शिवसेनेचं नाव लावायचं नाही," असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं.