MPSC New Syllabus : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करणार

MPSC New Syllabus:  MPSC नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली आहे. या निर्णयामुळे MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Updated: Feb 23, 2023, 07:01 PM IST
MPSC New Syllabus : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करणार title=

Pune MPSC Student Protest : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.  MPSC नवा अभ्यासक्रम (MPSC New Syllabus) 2025 पासून लागू करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली आहे. या निर्णयामुळे MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. अखेर या लढ्याला यश आले असून  MPSC विद्यार्थ्यांची मागणी आयोगाने  मान्य केली आहे. 

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत असल्याचे आयोगाकडून जाहीर करण्यात आले. 

गेल्या चार दिवसांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन सुरुय. नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. अधिकृत नोटीस काढल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी माडंली होती. 

तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! असं ट्विट शरद पवार यांनी केले आहे.

शरद पवारांनी घेतली होती  MPSC च्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट

शरद पवार यांनी पुण्यात MPSC च्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यास पुढाकार घेऊ असं आश्वासन शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थांना दिलं होतं. शरद पवारांसह विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात भेट घेणार होते.  शिंदे प्रचारात व्यस्त असल्याने ही बैठक रद्द करण्यात आली. मात्र, त्याआधीच  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करणार असल्याची घोषणा केली आहे. 

विद्यार्थ्यांनी मानले शरद पवार आणि मुख्यमंत्र्याचे आभार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करणार असल्याची घोषणा केल्यानंतर MPSC च्या आंदोलक विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी पुण्यात मोठा जल्लोष साजरा केला.