Uddhav Thackeray: पार्टीचं नाव देण्याचा अधिकार निवडूक आयोगाला नाही. आम्ही निवडणूक आयोगाचं नाव बदललं तर? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. अमरावती दौऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गेले वर्षभर कार्यकर्ते मातोश्रीवर येऊन भेटत आहेत. सर्वांनाच येणं शक्य होत नाही. पावसाचा सिझन संपला की निवडणुकीची रणधुमाळी सुरु होईल. जे कट्टर शिवसैनिक आहेत त्यांना त्यांच्या विभागात जाऊन भेटण्याचा निर्णय घेतलाय असे ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोग, भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला.काल पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर आज अमरावती येथील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.
पक्ष फोडण्याची प्रथा काही नवी नाही पण आता पक्ष चोरायला लागले आहेत, अशी टिका त्यांनी भाजपवर केली.
पूर्वी सरकार मतपेटीतून जन्माला यायचं पण आताचं सरकार खोट्यातून जन्माला येतंय. जो दमदाटी आणि पैशाचा खेळ करेल त्याचा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होऊ शकतो.
आम्ही निवडून दिलेल्या उमेदवाराला परत पाठवण्याचा अधिकार मतदाराला द्यायचा का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात दौऱ्याला सुरुवात करताना पवित्र स्थळापासून सुरुवात करावी असे वाटत होते. म्हणून पोहोरादेवीचे दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात केली आहे. पण जिथे जातोय तिथे लोकं भेटून आपण सोबत असल्याचे सांगत आहेत.
अमित शहांच्या भेटीबद्दल त्यांनी भाष्य केले. अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचे ठरले होते ही मी पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो,असेही ते म्हणाले. ठरल्याप्रमाणे अडीच अडीच वर्षे सेना-भाजपचा मुख्यमंत्री झाला असता. आता भाजपच्या नेत्यांना सतरंज्या उचलाव्या लागल्या नसत्या, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
कोणीही मुख्यमंत्री झाल्यावर शेतकऱ्यांना काय मिळतंय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पाऊस अजूनही पाहिजे तसा सुरु झाला नाही. पिकवीमा योजना, शेतकरी कर्ज, पिकाचा हमी भाव यासंदर्भात आम्ही काम करत होतो. दुर्देवाने करोना आला. त्यानंतर माझी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर हुडी घालून बैठका सुरु झाल्या. त्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला हवे होते.
आता मी दौऱ्याच्या ठिकाणी जाहीर सभा घेत नाही. शेतकरी आता शेतीच्या कामात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना भेटत आहे. त्यांच्या समस्या जाणून घेत आहे.
सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाच्या आमदारांसंदर्भात निर्णय दिला आहे. त्यानुसारच विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर आम्हाला सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडे आहेत.
शिवसेनेत इनकमिंग सुरु आहे. मेहनत करणाऱ्यांना संधी मिळते, असे ठाकरे म्हणाले.
शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात 31 जुलैला सुनावणी होणार आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय रद्द करावा अशी याचिका दाखल केली होती..त्यावर आता सुप्रीम कोर्टात 31 जुलैला सुनावणी होणार आहे.