Rohit Pawar on Sadabhau Khot: माजी मंत्री तथा रयत क्रांती सेनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) सैतान म्हटल्याने रोहित पवार (Rohit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे. "शरद पवार सैतान आहेत. या सैतानाला त्याचे पाप सध्या फेडावे लागत आहे," असं विधान सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना इशाराच दिला आहे. मराठी बाणा आणि रांगडी भाषा दाखवायची असेल तर आम्हीही दाखवू शकतो असं रोहित पवार म्हणाले आहेत.
"सदाभाऊ खोत यांनी मर्यादेत राहावं. मराठी बाणा आणि रांगडी भाषा दाखवायची असेल तर आम्हीही दाखवू शकतो. बातमी होण्यासाठी जर तुम्ही तुमची लायकी सोडत असाल तर आम्ही शांत बसणार आहोत का?," अशा शब्दांत रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
पुढे ते म्हणाले की, "तुमची सत्ता आहे ते ठीक आहे. तुमची घुसमट होत आहे. तुम्हाला आमदारकी मिळत नाही म्हणून टिमकी वाजवत असाल. पण जर लोकांनी तुमची टिमकी वाजवायला सुरुवात केली तर तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही".
"शरद पवार सैतान, या सैतानाला त्याचे पाप...."; सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली
"शिंदे गटाला 9 का 10 मंत्रीपदं मिळाली होती. दुसऱ्यांदा मंत्रीपद देताना वर्ष ओलांडलं. आता या 9 लोकांना मंत्रीपद दिलं आहे. पण 9 दिवस झाले तरी मंत्रालय दिलेलं नाही. त्यामुळे आता कोणाची खाती कमी करणार, कोणाला देणार ही चर्चा सुरु होणार आहे. लोकांनाही आता हा आपल्यासाठी नाही तर सत्तेसाठी संघर्ष सुरु असल्याचं समजत आहे," अशी टीका रोहित पवार यांनी केली. जे मंत्री वर्षभर काम करत आहेत, त्यांनी गेल्या एका वर्षात काही केलेलं दिसत नाही असं सांगत त्यांनी हे बिनकामाचे मंत्री असल्याची टीका केली.
आजचा विरोधी पक्षनेता उद्याचा मुख्यमंत्री असू शकतो असं माझं मत आहे. शिंदे-भाजपातील वातावरण पाहता एक पुतण्या, कार्यकर्ता म्हणून मला उद्या अजितदादा मुख्यमंत्री होतील असं वाटलं होतं असंही रोहित पवार म्हणाले.
"शरद पवार सैतान आहेत. पवारांवर नियतीने,काळाने मोठा सूड उगवला आहे. या सैतानाला त्याचे पाप सध्या फेडावे लागत आहे. गाव गाड्यात हा सैताना पुन्हा येता कामा नये. त्याने नवं सरकार उभं करता कामा नये हे आमचं मुख्य काम आहे. गावगड्याला आता लढाई लढावी लागणार आहे," असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
"80 च्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा उदय झाला आणि तिथून पुढे राजकारणाचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. राजकारणाचा इतका ऱ्हास झाला की वाडे विरुद्ध गावगाडे आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा नवा संघर्ष उभा राहिला. सरंजामशाहीचा कालखंड पवारांमुळे उभा राहिलेला संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि हा अंमल जवळजवळ 50 वर्ष या राज्यामध्ये राहिला," असंही यावेळी ते म्हणाले.
"पुण्यामधून काका मला वाचवा अशी हाक ऐकू महाराष्ट्राल ऐकू आली होती. पण आता एक नवी हाक सर्वांना ऐकू येत आहे, ती म्हणजे पुतण्यापासून मला वाचवा," असा टोला यावेळी त्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी गवताचा भारा विस्कटला, आता गवताच्या कांडया तुटून पडतील असं भाकितही त्यांनी वर्तवलं