Electric Bike News : उमेश परब / सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोन युवकांनी कमाल करुन दाखवली आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता बहुतांशी लोक इलेक्ट्रिक बाईकला पसंती देताना दिसून येत आहे. बाजरात हीच इलेक्ट्रिक बाईक एक ते सव्वा लाख पर्यंत मिळते. मात्र हीच बाईक सामन्यांच्या खिशाला परवडणारी अशी असेल तर.. ही किमया कणकवली येथे राहणाऱ्या युवकांनी करुन दाखवली आहे. केवळ 35 हजार रुपयात इलेक्ट्रिक बाईक बनवली आहे.
देशात पेट्रोल आणि डिझेल या इंधनाच्या किमती गगणाला भिडत आहेत. त्यामुळे देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच अनेक कंपन्यांनी त्यांची इलेक्ट्रिक वाहने बाजारात लॉन्च करत आहेत. तसेच अनेक कंपन्या ऑटो मार्केटमध्ये त्यांची इलेक्ट्रिक वाहने सादर करत आहेत. मात्र, दुसरीकडे ज्याला ही वाहने घेण्यास परवडत नसल्याने काही तरुणांनी जुगाड करुन स्वस्तात बाईत तयार केली. दुचाकीचे टाकाऊ पार्ट एकत्र करत केवळ 35 हजार रुपयांत ही दुचाकी या युवकांनी तयार केली आहे. त्यांच्या कामगिरीचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे. कणकवली येथील तुषार पवार आणि वैभव राणे या दोन युवकांनी सामान्यांना परवडेल अशी दुचाकी तयार करण्याचे स्वप्न उराशी बाळगून ही दुचाकी तयार केली आहे.
भंगारात टाकलेले दुचाकींचे पार्ट आणि इतर इलेक्ट्रिक साहित्य बाजारातून खरेदी करुन दोन महिन्याच्या कालावधीत ही इलेक्ट्रिक दुचाकी या युवकांनी बनविली आहे. ही दुचाकी एकदा चार्ज केली की तीन तासात तब्बल 50 ते 55 किलोमीटरपर्यंत धावू शकते. या महागाईच्या जमान्यात या युवकांनी बनवलेली ही इलेक्ट्रिक बाईक सामान्यांच्या खिशाला परडवडणारी अशीच आहे, अशी माहिती तुषार पवार यांने दिली.
जर तुम्हाला इलेक्ट्रिक बाईक खरेदी करायचे असेल तर तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागते किंवा कंपनीकडे गाडी बुक करावी लागते. तरीही बाईक तात्काळ मिळेल असे नाही. त्यासाठी प्रतिक्षा करावी लागते. इलेक्ट्रिक बाईक बुक करणे आणि त्याच्या किमती पाहता ते सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. इलेक्ट्रिक बाईक घ्यायची झाली तर साधारणत: एक लाख ते सव्वा लाखांच्या घरात किंमत आहे. मात्र, सिंधुदुर्गातील तरुणांनी बनवलेली बाईक केवळ 35 हजार असल्याने याची चर्चा आहे.