Junior Colleges Online Admission 2023 : विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी. 2023-2024 या शैक्षणिक वर्षातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाचं वेळापत्रक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 20 मेपासून अर्ज भरण्यासाठीचा सराव अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या साईटवर करता येणार आहे. 25 मेपासून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या भागासाठी नोंदणी करता येईल. दुसरीकडे प्रवेश प्रक्रिया ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा ती वेळेत पूर्ण होऊन अकरावीचे वर्गही लवकर सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगर प्रदेश, पुणे-पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर आणि अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी केंद्रीकृत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश अर्जाच्या भाग एकसाठी ऑनलाईन नोंदणी 25 मे रोजी सुरु होईल, दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांत प्रवेशाची पहिली फेरी होईल. ऑगस्टअखेर संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
सीबीएसई आणि आयसीएसई 10वी परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झालेत. चालू शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये सुरु करण्यात येत आहे. राज्य मंडळाच्या दहावीचा निकाल लवकरच लागेल. त्यामुळे ही पुढील प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांसाठी माहिती, मार्गदर्शन, कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालकांना देण्यात आल्या आहेत. यामध्ये विद्यार्थी आणि पालकांसाठी अभिमुखता वर्ग आयोजित करणे, तसेच शालेय मार्गदर्शन केंद्रांसाठी प्रशिक्षण देणे समाविष्ट आहे.
वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 20 मे ते 24 मे या कालावधीत ऑनलाईन अर्ज नोंदणीद्वारे प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करण्याची संधी मिळणार आली आहे. प्रवेश अर्जाच्या पहिल्या भागासाठी ऑनलाईन नोंदणी 25 मे रोजी सुरु होईल आणि अर्ज प्रमाणित केले जातील. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी 20 मेपासून दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत सुरु राहणार आहे. 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अल्पसंख्याक, व्यवस्थापन आणि संस्थांतर्गत राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होईल, अशी शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेला 25 मे पासून होणार सुरुवात आहे. अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ: https://11thadmission.org.in या संकेतस्थळाला भेट द्या. प्रवेशाची पहिली फेरी निकाल जाहीर झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवस राबविली जाईल तर दुसरी आणि तिसरी फेरी प्रत्येकी सात ते नऊ दिवस आणि विशेष प्रवेश फेरी एक - सात ते आठ दिवस राबविण्यात येईल.