टीईटी पेपरफुटी प्रकरणी तुकाराम सुपेसह आणखीन दोन मोठे मासे गळाला

टीईटी पेपरफुटी प्रकरणी औरंगाबाद बोर्डाचा माजी विभागीय अध्यक्षासह तिघेअटकेत, पुणे सायबर पोलिसांचा आणखी एक दणका, आणखी बडे मासे गळाला लागण्याची शक्यता 

Updated: Dec 21, 2021, 01:54 PM IST
टीईटी पेपरफुटी प्रकरणी तुकाराम सुपेसह आणखीन दोन मोठे मासे गळाला title=

पुणे : टीईटी पेपरफुटी प्रकरणात तपास सुरू असताना अनेक घोटाळे सामोर आले आहेत. 2018 मध्ये झालेल्या TET परीक्षा सूत्रधार सुखदेव डेरेला अटक केली आहे. तसेच अश्विन कुमार यालाही अटक करण्यात आली आहे. ही लोक मार्कशीट कोरी ठेवायला लावत असत आणि निकाल बदलायचे. आतापर्यंत 500 लोकांचा निकाल बदलला गेला आहे. त्यांना खोटी सर्टिफिकेट दिली गेली आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

टीईटी पेपरफुटी प्रकरणी तुकाराम सुपेसह आणखीन दोन मोठे मासे गळाला लागले आहेत. पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरेसह जी.ए सॉफ्टवेअर कंपनीचा 2017 सालातील संचालक अश्विन कुमारला अटक केली. तर बीडमधून TET एजंट संजय सानपवर कारवाई करण्यात आली आहे. टीईटी परीक्षेत गैर मार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने ही कारवाई केली आहे.यामुळे खळबळ उडाली असून अजून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे :

- TET 2018 परीक्षेत निकालात फेरफार
- पुणे पोलिसांच्या तपासात फेरफार झाल्याचं निष्पन्न
- अपात्र परीक्षार्थीकडून पैसे घेऊन केले गेले पात्र
- १५ जुलै २०१८ ला झाली होती परीक्षा
- ५०० परिक्षार्थ्यांकडून ५० ते ६० हजार रुपये घेतल्याची
- गोळा झालेले पैसे वाटून घेण्यात आले
- २०१८ साली सुखदेव डेरे होते परीक्षा परिषदेचे आयुक्त
- डेरे, सुपे, देशमुख, सावरीकर, हरकळ बंधूनी पैसे वाटून घेतल्याची माहिती
- GA सॉफ्टवेअर कंपनीने निकाल जाहीर करताना केली फेरफार
- अपात्र विद्यार्थ्यांचे निकाल पात्र म्हणून केले अपलोड

दरम्यान, पेपरफुटी प्रकरणात बडे मासे गळाला लागण्याचं सत्र सुरुच आहे. एकीकडे औरंगाबाद बोर्डाचा माजी अध्यक्ष सुखदेव डेरे यांना अटक केली असताना दुसरीकडे बंगलोरमध्येही पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने एकाला गजाआड केले आहे. परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या GA सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीच्या संचालकाला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अश्विनकुमार असं या आरोपीचं नाव आहे. पुणे पोलीस पत्रकार परिषद घेऊन या दोघांच्याही भूमिकेविषयी खुलासा करणार आहेत. दिवसेंदिवस पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढत असताना बडे अधिकारी गळाला लागत आहेत. परीक्षा परिषदेचा अटकेत असलेला निलंबित आयुक्त तुकाराम सुपे याच्या चौकशीतून डेरे याचे नाव समोर आल्याचं समजत आहे. तर प्रितेश देशमुखच्या चौकशीतून अश्विनकुमारपर्यंत पुणे पोलिसांना पोहोचता आले आहे.