Truck Driver Strike Fuel Shortage: नवीन मोटर वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी आंदोलन पुराकले आहे. त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. ट्रक चालक संपवार जाणार असल्याने इंधन तुटवडा निर्माण होऊ गाड्यांमध्ये इंधन भरता येणार नाही अशी भीती सर्वसामान्यांना वाटत आहे. याच भीतीने महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांसमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रत्नागिरी, संभाजी नगर, लातूर, नागपूर, वसई-विरार नाशिकसारख्या शहरांमध्ये इंधन भरण्यासाठी सर्वसामान्यांच्या काही किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्यात. दुसरीकडे आज दादर भाजी मार्केटमध्ये या संपामुळे भाजांची आवाक कमी झाल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत. या संपाचा फटका स्कूल बस, रुग्णवाहिकांनाही बसत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र असं असतानाच इंधन वाहून आणणाऱ्या टँकर चालकांबरोबरच ट्रक चालकांनी केलेला हा संप नेमका कशासाठी आहे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. यावरच नजर टाकूयात...
नुकताच केंद्र सरकारने मोटार वाहन कायदा पारित केला आहे. यानुसार अपघातास जबाबदार असलेल्या ट्रकचालकांविरोधातील कायदा कठोर करण्यात आला आहे. या नव्या बदलांमध्ये सर्वात मोठा बदल हा हिट अॅण्ड रन कायद्यात करण्यात आला आहे. याच कायद्याविरोधात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसहीत इतर अनेक राज्यांमध्ये ट्रक चालकांनी मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाची झळ आता सर्वसामान्यांना बसू लागली आहे. मध्य प्रदेशमधील वाहतूक व्यवस्थाच कोलमडली आहे. ट्रक चालकांचा नव्या कायद्यामधील तरतुदींना विरोध आहे.
एखादा अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरुन पळून जाण्याच्या प्रकाराला हिट अॅण्ड रन असं म्हणतात. नव्या कायद्यानुसार ट्रक चालकांकडून अपघात झाला त्यांनी एखाद्या वाहनाला धडक दिली तर 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच 7 लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. पूर्वी हा दंड 2 वर्षांची शिक्षा आणि 5 लाख दंड अस होता. तसेच या प्रकरणामध्ये लगेच जामीनही मंजूर केला जात होता. मात्र या कायद्यात बदल करण्यात आल्याने जामीन मिळणही कठीण होणार आहे.
ट्रक चालकाकडून अपघात झाला आणि अपघातात जखमी व्यक्तीला मदत न करता ट्रक चालक अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेल्यास 10 वर्षे कारावास आणि 5 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. नवीन कायदे फारच कठोर असल्याचा आरोप ट्रकचालकांनी केला आहे. त्यामुळे या कायद्यामुळे देशभरातील ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून हा कायदा अति कठोर आणि अन्याय कारक असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे. मात्र नवीन कायद्यामध्ये अपघातानंतर जखमींना मदत करणाऱ्या त्यांना रुग्णालयामध्ये घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकांना या शिक्षेमधून सूट मिळणार आहे.
हिट अॅण्ड रन प्रकरणांसंदर्भात देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत माहिती दिली. नवीन कायद्यातील तरतुदी अधिक कठोर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. भारतामध्ये दरवर्षी हिट अॅण्ड रन प्रकरणामध्ये 50 हजार लोक प्राण गमावतात.
सोमवारी नवी मुंबईमधील उलवे येथे बेलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी ट्रक चालक फारच आक्रमक झाले आणि त्यांनी थेट पोलिसांवर हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली. बेलापूर महामार्ग रोखून धरण्याचा ट्रक चालकांचा डाव हाणून पाडला. एनआरआय पोलिसांनी शेकडो ट्रक चालकांना ताब्यात घेतलं. यानंतर पनवेल-सायन रस्ता ट्रक चालकांनी रोखल्याने वाहतूक कोंडी झाली.