चंद्रशेखर भुयार झी मीडिया, मुरबाड : ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटलं की गावातली भंग होणारी शांतता निवडणुकीसाठी लागणारा पैसा, हे ओघानं मानलंच जातं.
मात्र या साऱ्यापासून ६५ वर्षं एक गाव दूर होतं. यंदा मात्र ही परंपरा मोडीत निघाली आहे. आता गावाचं म्हणणंय आम्हाला निवडणूक नको आहे, का म्हणतंय गाव निवडणूक नको.
ग्रामपंचायत निवडणुका म्हटलं की तणाव हा आलाच.. तणाव निर्माण करणाऱ्या निवडणुका नकोच म्हणत मुरबाडजवळच्या कान्होळ ग्रामपंचायतीचा कारभार सुरु होता. या ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून एकदाही निवडणूक न घेता सर्वच सदस्य बिनविरोध निवडण्याची परंपरा ६५ वर्ष ग्रामपंचायतीत होती.
राज्यभरात या ग्रामपंचायतीचं कौतुक होतं होतं. पण राज्य शासनाच्या नव्या निर्णयानुसार थेट मतदारांमधून सरपंचपदाची निवड केली गेली आणि कान्होळची परंपरा मोडीत निघाली.
सरपंचपदासाठी निवडणूक झाली. परंपरा मोडीत निघाली आणि गावातली शांतताही भंग झाली. याबाबत ग्रामस्थ काय सांगतायत ऐका.
निवडणुका शांततेत, पैशांशिवाय होत असतील तर त्याला सरकारनं पाठिंबा द्यायला हवा अशी मागणी करत, कान्होळ गाव थेट सरपंचपदाच्या निवडणूकीतून वगळावं अशी इच्छा ग्रामस्थांसह विद्यमान सरपंचांनीही केलीय.
सांडपाण्याचा निचरा, शौचालय, स्वच्छता, वृक्ष लागवड, तंटामुक्ती अशा विविध उपक्रमांमुळे कान्होळ गाव जिल्ह्यात आदर्श ठरलंय. पण शासन निर्णयानं ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झालीय.