Gudi Padwa 2023: रात्रंदिवस केलेली मेहनत गेली पाण्यात; गुढी पाडव्याच्या उत्सवात रंगाचा बेरंग

 Gudi Padwa 2023:  मुंबईत गुडी पाडव्या निमित्ताने अनेक ठिकाणी शोधा यात्रा काढल्या जातात. रांगोळी काढून नव वर्षाचे स्वागत केले जाते. यंत्रा मात्र, गुढी पाडव्याच्या उत्सवात पावसाचे विघ्न आले आहे. 

Updated: Mar 21, 2023, 04:45 PM IST
Gudi Padwa 2023:  रात्रंदिवस केलेली मेहनत गेली पाण्यात; गुढी पाडव्याच्या उत्सवात रंगाचा बेरंग title=

अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : मराठी वर्षाची सुरुवात गुढी पाडवा (Gudi Padwa 2023) या सणापासून होते. यामुळे हिंदू धर्मात गुढी पाडवा या सणाला विशेष महत्व आहे. मुंबईत (Mumbai) गुढी पाडव्याच्या सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी शोधा यात्रा काढल्या जातात. यासाठी आधीपासून तयारी सुरु होते. यंदा 22 मार्च रोजी गुढी पाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे. मात्र, राज्यभरात सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे गुढी पाडव्याच्या तयारीसाठी केलेली मेहनत पाण्यात गेली आहे. अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) गुढीपाडव्याच्या उत्सवात रंगाचा बेरंग झाला आहे. मुंबईच्या मुलुंड (Mulund) परिसरात साकारलेल्या 120 फुटांच्या रांगोळीची (Rangoli) पावसामुळे दुर्दशा झाली आहे. 

गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुलुंड मध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होते. या उत्सवावर अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने विरजण टाकले आहे. गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुलुंडच्या संभाजी मैदानामध्ये 120 फुटांची भव्य संस्कार भारती रांगोळी काढण्यात आली होती.

दोन दिवस कलाकारांनी तब्बल 300 किलो रांगोळी आणि 800 किलो रंग वापरून ही रांगोळी साकारली होती. मात्र, सोमवारी रात्री पडलेल्या पावसात ही संपूर्ण रांगोळी नष्ट झाली आहे. त्यामुळे दोन दिवस मेहनत करून साकारलेल्या या रांगोळीची अशी अवस्था पाहून कलाकारांचा हिरमोड झाला आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने मैदानात भव्य रांगोळी साकारण्यात येते परंतु पहिल्यांदाच पाडव्याच्या आधी पडलेल्या पावसामुळे संपूर्ण रांगोळी पुसटली गेली. सगळ्या मेहनीवर पाणी फिरल्याने रांगोळी साकारणारे कलाकार निराश झाले आहेत. 

नाशिकमध्ये 25 हजार स्क्वेअर मीटर फुटांची भव्य रांगोळी

नाशिकमध्ये देखील गुढी पाडव्याचा सण जल्लोषात साजरा केला. गोदाकाटावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जातो. याचीच जोरदार तयारी सध्या सुरु आहे.  नाशिकच्या गोदावरी नदी काटावरील पाडवा पटांगणावर 25,000 स्क्वेअर मीटर फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.  पर्यावरण रक्षण या अंतर्गत पंचमहाभूते या विषयावर ही रांगोळी काढण्यात आली आहे. नाशिक महापालिका आणि नववर्ष स्वागत समिती यात्रा यांच्या संयुक्त विद्यमाने ही रांगोळी साकारण्यात आली आहे. ही रांगोळी पाहण्यासाठी नाशिककर गर्दी करत आहेत.