बारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या? सुप्रियांचं सूचक विधान; म्हणाल्या, 'कोणतीही...'

Ajit Pawar Vs Yugendra Pawar: बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली आता पुन्हा इथे पवार विरुद्ध पवार लढाई पाहायला मिळणार अशी शक्यता आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 6, 2024, 04:48 PM IST
बारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या? सुप्रियांचं सूचक विधान; म्हणाल्या, 'कोणतीही...' title=
पत्रकारांच्या प्रश्नाला बोलताना दिलं उत्तर

Ajit Pawar Vs Yugendra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. अगदी रविंद्र वायकरांना मिळालेल्या क्लिन चीटपासून ते बारामतीमध्ये यंदाच्या विधानसभेला होऊ घातलेल्या संभाव्य काका-पुतण्या लढाईबद्दल बऱ्याच विषयांवर सुप्रिया यांनी उत्तरं दिली. बारामतीमधील संभाव्य काका-पुतण्या लढाई म्हणजेच अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढाईबद्दल सूचक विधान केलं आहे. सुप्रिया सुळे या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात मुद्देसूदपणे...

राज्यात गुन्हेगारी वाढली

पुणे महिला पोलीस हल्ल्यासंदर्भात विचारलं असता सुप्रिया सुळेंनी, "आज राज्य परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पुण्यात सातत्याने गुन्हेगारी वाढत आहे. मी आरोप करत नाही, हे डेटा सांगतोय. केंद्र सरकारचा डेटा महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढल्याचं सांगतोय. अगोदर नागपूर केंद्र असायचं आता पुणे आहे. "पुण्यात जे घडलं ते दुर्दैवी आहे. महाराष्ट्र सरकार काय करते? महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करतात? सातत्याने हे सुरू आहे. या राज्यात सर्व सावळा गोंधळ सुरू आहे. 200 आमदारांचे सरकार आहे पण तुमच्या आणि माझ्या पदरात काय पडले विकास कोणाचा केला या सरकारने? महाराष्ट्राचा आज देशात नंबर खाली जायला लागला आहे," अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.

वायकरांवरुन फडणवीसांना टोला

रविंद्र वायकरांना पोलिसांनी कथित भूखंड घोटाळ्यात क्लिन चीट दिल्यासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळेंनी, "भारतीय जनता पक्ष स्वातंत्र लोकांवर आरोप करतात त्यानंतर त्यांचा भाजपा किंवा मित्र पक्षात प्रवेश घेतात आणि नंतर मंत्री आमदार किंवा खासदार पदावर बसतात. भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारांची टोळी आहे," असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना, "वायकर भ्रष्टाचारी आहेत की नाही याचे उत्तर फक्त देवेंद्र फडणवीस देऊ शकतात. जे महाराष्ट्रातले आमदार खासदार जे आज तुमच्याबरोबर आहेत ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप केले ते सिद्ध झाले नाही. खरं काय खोटं काय याची एक पारदर्शक श्वेतपत्रिका या राज्याने मागितले पाहिजे की नक्की या राज्यात भ्रष्टाचार कोण करत आहे? हे फक्त महाराष्ट्र पुरतं मर्यादित नाही. केंद्रीय संस्थाचा तपास मागे लावायचा नंतर वॉशिंग करायचं आणि पक्षात घ्यायचं," असं सुप्रिया सुळे म्हणाले.

निधीसाठी अजित पवारांना पत्र

जिल्हा नियोजन मंडळ निधीसंदर्भात अजित पवारांना लिहिलेल्या पत्राबद्दल बोलताना सुप्रिया सुळेंनी, "पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी पत्र लिहिलं आहे याचा कारण की अमोल कोल्हे आणि मला निधी मिळत नाही. जनतेच्या कामासाठी आम्ही निधी मागत आहोत. आम्ही निवडून आलेल्या लोकांचे प्रतिनिधी आहोत. पाच टक्क्यांचा तर आमचा अधिकार आहे ना? आम्ही आमच्या कामसाठी निधी मागत नाही. लोकांचा विकास हवा आहे. आम्हाला क्रेडीट नको. आमचं काम आहे लोकांच्या सेवेसाठी आम्ही निधी मागत आहोत," असं म्हटलं.

काका-पुतण्या लढाई

बारामतीमधील विधानसभेच्या संभाव्य काका-पुतण्या लढाईबद्दल विचारलं असता सुप्रिया सुळेंनी, "माझ्यासाठी विधानसभेची निवडणूक इंडिया आलायसेस विरुध्द एनडीए अशी आहे. मी कोणतीही निवडणूक व्यक्तीच्या विरोधात लढत नाही. माझी लढाई ही वैचारिक असते. हे माझ्या कृतीतून आणि भाषणात दिसते," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.