मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर जर भारताचा अपमान होत असेल तर आपण सर्व परस्पर मतभेद विसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहू असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी म्हंटले. आपल्या देशाचे नेते असो किंवा सरकार, त्यांचा जर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अपमान होत असेल, तर ते योग्य नाही. आम्ही त्यासाठी पंतप्रधान मोदींच्या सोबत आहोत. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिल्यानंतर, महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय हालचाली वाढल्या आहेत.
संजय राऊत म्हणाले, "जर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा अपमान झाला तर आपण सर्व जण परस्पर मतभेद विसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहू. मोदी ज्या मार्गाचा अवलंब करतील, आम्ही त्यांच्या मागे उभे राहू. मग ते तुमच्या देशाचे नेते असोत किंवा सरकार, त्यांचा जर आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान होत असेल तर ते योग्य नाही. आपल्या देशाच्या कोरोना परिस्थितीचे ज्या प्रकारे चित्रे उभे केले जात आहे आणि दाखवले जात आहेत, त्याचा परिणाम देशाच्या सामाजिक आरोग आणि अर्थव्यवस्थेवर होणार आहे."
पुढे ते म्हणाले "भारताला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलेले असू शकते. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचा हा डाव देखील असू शकतो. या विरोधात आपण सर्वांनी एकत्रित लढायला हवे आणि पंतप्रधान मोदींच्या पाठीशी उभे राहायला हवे. "
देशातील वाढत्या कोरोना संकटासाठी निवडणूक आयोगाला फटकारणाऱ्या मद्रास उच्च न्यायालयावरही संजय राऊत यांनी आपला प्रतिसाद दिला आहे. संजय राऊत म्हणाले की, आपल्या देशातील एक मोठा मंत्री म्हणतो की, निवडणुका आणि कोरोना यांच्यात कोणताही संबंध नाही.
पश्चिम बंगाल, केरळसारख्या मोठ्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने देशभरातील लोकांना तेथे प्रचार करण्यासाठी नेले. ते आपापल्या राज्यात परत गेले आणि कोरोनाचे वाहक बनले. कुंभमेळ्यापेक्षा कोरोना या राजकीय कुंभमेळ्यामुळे जास्त पसरला आहे. आज देशातील परिस्थिती नाजूक बनली आहे. या सगळ्याची काळजी अगोदरच घ्यायला हवी होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर गांभीर्याने विचार करायला हवा.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास असल्याचेही ते म्हणाले. कोरोनाच्या दुसर्या व तिसर्या लाटेसाठी त्यांनी धोरण आखले आहे. त्यामुळे मद्रास उच्च न्यायालयाच्या टीकेला मोदी गांभीर्याने घेतील असा विश्वास आहे.
संजय राऊत हे सहसा केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर कडक टीका करताना दिसतात. पण आज माध्यमांशी बोलताना ते ज्या प्रकारे बोलंत होते, ते पाहून संजय राऊत नक्की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर टीका करत होते की, त्यांचे कौतुक करत होते हे काही समजत नव्हते. आजचे त्यांचे वक्तव्य आंबट- गोड असल्या सारखे पाहायला मिळाले.
मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णायाचा उल्लेख करताना संजय राऊत म्हणाले की, "निवडणूक आयुक्तावर मानवी कत्तलीचा गुन्हा का दाखल होऊ नये?" ते पुढे म्हाणाले," म्हणजेच ज्या निवडणूक आयुक्तच्या काळात कोरोना पसरला, त्याच निवडणुक आयुक्तांना राज्यपाल केले जात आहे? माझ्या कानावर तर हेच आले आहे. एकीकडे मद्रास उच्च न्यायालय त्यांच्यावर हत्या करण्याचा गुन्हा दाखल करण्याविषयी बोलत आहे, तर दुसरीकडे निवडणूक आयुक्तांना रिटर्न भेट देत आहे."