हिंगोली : देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अशातच माणुसकीचे कर्तव्य म्हणून अनेक लोक आपल्या परिने मदत करण्यासाठी या कठीण काळात पुढे येत आहेत. यामध्ये सर्व सामान्य लोकांबरोबरच नेते, बॉलिवूड स्टार्स आणि खेळाडूही मदतीसाठी पुढे येत आहेत. अशातच महाराष्ट्रातून एक आमदार समोर आले आहे, ज्यांनी पुढे येऊन आपले कर्तव्य बजावले आहे.
शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी जनतेसाठी आपली FD तोडली. कोरोना रूग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळावे, यासाठी या आमदाराने हे पाऊल उचलले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर कार्यरत आहेत. त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोना रुग्णांना देण्यासाठी, त्यांची 90 लाख रुपयांची FD तोडली. आमदाराने हे 90 लाख रुपये खासगी लस वितरकाला दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.
यापूर्वी त्यांनी आपल्या खर्चाने गरजूंना 500 इंजेक्शन्स दिली आहेत. परंतु संक्रमित लोकांची संख्या वाढत गेली. त्यानंतर इंजेक्शन तयार करणार्या कंपनीने, दहा हजार इंजेक्शनसाठी दीड कोटी रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले.
संतोष बांगर यांनी 2019 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपली 92 लाख रुपयांची संपत्ती दाखवली होती. ज्यामधून त्यांनी कोरोना रूग्णांसाठी 90 लाख रुपये काढले आणि ऍडव्हांस म्हणून कंपनीत पैसे जमा केले. त्यांनी सांगितले की, "इंजेक्शन आल्यानंतर जिल्हा प्रशासन हे इंजेक्शन गरजूंना मोफत देईल. सोमवारी संध्याकाळपर्यंत त्याचा पहिला स्टॅाक हिंगोली जिल्ह्यात येणार आहे."
आमदार संतोष बांगर म्हणतात की, "लोकांची सेवा करणे हा आपला सर्वात मोठा धर्म आहे. ज्या लोकांनी आज आमदार केले, त्यांची सेवा करणे ही संकटाच्या वेळी मोठी माणुसकी आहे." आमदार संतोष बांगर यांच्या या निर्णयाचे सर्वजण कौतुक करत आहेत.