किती मिलीमीटर पाऊस झाल्यावर पेरणी करावी?, कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra Mansoon Updates:  राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र, आता कृषी विभागाने एक महत्त्वाचं अवाहन केलं आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 7, 2023, 03:08 PM IST
किती मिलीमीटर पाऊस झाल्यावर पेरणी करावी?, कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी दिली महत्त्वाची माहिती title=
sow only after adequate rainfall Agriculture department appeals to farmers

Maharashtra Weather Forecast: राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व (Pre Monsoon) पावसाने हजेरी लावली होती. पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. पावसाच्या आगमनामुळं बळीराजा सुखावला होता. मात्र हवामान विभागाकडून मान्सून लांबला असल्याची माहिती येत आहे. अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) निर्माण होत असल्याने मान्सूनसाठी (Monsoon) प्रतीक्षाच करावी लागणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी (Farmers) पेरण्या करण्यासाठी घाई करु नये, असं अवाहन कृषी विभागाने केलं आहे. 

राज्यात मान्सून लांबला

दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पाऊस लवकर होत असल्याने शेतीच्या कामानांही वेग देता येईल. यामुळं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, केरळातील मान्सून सक्रीय झाला नसल्याने राज्यातही मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या राज्यात होत असलेला पाऊस ही मान्सूनपूर्व पाऊस आहे. राज्यात १३ ते १५ जूनदरम्यान मान्सून येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनी आत्ताच पेरणीची घाई करु नये असं अवाहन कृषी विभागाने केलं आहे. 

पेरणीची घाई करु नका

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता किमान 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करावी. कारण पुरेशा खोलीवर ओलावा जातो. त्यामुळे पावसाचा खंड पडल्यास हि पीके तग धरू शकते नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

कृषी विभागाचे अवाहन

अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यास पावसाच्या खंड काळात पेरणी वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरणी करावी असे आवाहन लातूरच्या कृषी विभागाने केलं आहे.

चक्रीवादळाचा धोका

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्राच्या दक्षिण पूर्व भागावर घोंगावणाऱ्या वाऱ्यांचं रुपांतर चक्रीवादळामध्ये झालं आहे. या वादळामुळं येत्या २४ तासांत कोकणच्या किनारपट्टीचा भाग रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील बहुतांश भागांमध्ये पाऊस बरसू शकतो. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईपासून ९०० किलोमीटर अरबी समुद्रात सक्रीय आहे. पुढील सहा तासांत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या मच्छिमार बांधवांनी नौका समुद्रात नेऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.