पिंपरी : किरकोळ कारणावरून एका व्यक्तीची हत्या करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड पोलीसांनी अटक केली. निलेश सतीश धुमाळ आणि राजेंद्र थोरात अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दारू पिताना बालाजीकडून निलेशचा दारूचा ग्लास सांडला म्हणून निलेशने काठ्या आणि दारूच्या बाटलीने मारहाण करून बालाजीची हत्या केली.
बालाजीची हत्या केल्यानंतर मृतदेह माण म्हाळूंगे रस्त्याच्या कडेला 15 जुलै रोजी टाकण्यात आला होता. CCTV फुटेजची पाहणी केल्यानंतर कचऱ्याच्या गाडीतून मृतदेह टाकण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तपासासाठी दोन पथके बनवत पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपींना अटक केली.
राजेंद्र थोरात हा कचरा गाडी चालक आहे. त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्यामुळे त्याच्यावर ही गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी आरोपी निलेश आणि बालाजी दारू पित होते त्या कंट्री बार मधल्या दोन कामगारांवर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनीही कचरा गाडीत मृतदेह टाकण्यास मदत केल्याचे पोलिस तपासात सामोर आले.
मयत बालाजी याची पूर्ण माहिती अद्याप समोर आली नसली तरी तो मूळचा नांदेडचा असल्याचे पोलिस तपासात समोर आलंय. तो रस्ते सफाईचे काम करत होता. त्याच्या कुटुंबीयांचा शोध पोलीस घेत आहेत..