पुणे : म्हाडा (MHADA), टीईटीपाठोपाठ (TET) आता पोलीस भरतीही (Police Recruitment) संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचा (GA Software Technologies) संचालक डॉ. प्रीतीश देशमुख (Pritish Deshmukh0 याच्या घरातून पोलीस भरतीची ओळखपत्रं सापडली आहेत. 2019 ते 2021च्या पोलीस भरती परीक्षेतील तीन विद्यार्थ्यांची ओळखपत्रं पुणे पोलिसांच्या हाती लागली आहेत.
पोलीस कोठडीत वाढ
दरम्यान, म्हाडा पेपरफुटी (Mhada Paper Leak) प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीत 23 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. जी.ए. टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख, अंकुश हरकळ आणि संतोष हरकळ अशी या आरोपींची नावे आहेत. प्रीतिश देशमुखच्या घर आणि कंपनीच्या कार्यालयाच्या झडतीमध्ये 23 हार्ड डिस्क, एक फ्लॉपी डिस्क, 41 सीडी तसंच इतर कागदपत्रं सापडली आहेत.
म्हाडा पेपरफुटीचे सूत्रकार कोण?
आरोग्य विभागाचा पेपर फोडणारेच म्हाडा पेपरफुटीचे सूत्रधार असल्याचं उघड झालं आहे. या पेपरफुटीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या क्लास चालकांनी म्हाडाच्या परीक्षार्थींना पास करुन देण्यासाठी चक्क रेटकार्ड तयार केलं होतं. यात प्रत्येक पदासाठी वेगळा रेट निश्चित करण्यात आला होता.