सांगली :- मुंबईत कोरोनाचे रूग्ण वाढत आहे. देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी 'कोरोना कॅपिटल' म्हणून ओळखली जात आहे. धारावीत कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहे. धारावीत कोरोनाबाधितांची संख्या ही १४२५ वर पोहोचली आहे. धारावीच्या झोपडपट्टीतुन २१ जण सांगली जिल्ह्यातील इस्लामपुर मध्ये आल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. यामुळे आता सांगलीत भीतीचं वातावरण आहे.
कोरोना विषाणू संसर्गाने अत्यंत धोकादायक बनलेल्या मुंबई येथील धारावी झोपडपट्टीतून २१ लोक अचानक इस्लामपूर शहर आणि वाळवा तालुक्यात आले आहेत. यामुळे प्रशासनाचा गोंधळ उडाला आहे.
बेकायदेशीर सांगली जिल्ह्यात आलेल्या प्रकरणी दोन जणांवर इस्लामपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जण इस्लामपुरमध्ये आले होते तर १६ जण हायवेवर थांबले होते. २१ पैकी २० जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. सर्व लोकांना मिरजेतील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये इंश्ंट्यूशन क्वारंटाइन केलं आहे.
दोघांमध्ये तापाची लक्षणे आढळल्यामुळे त्यांची तपासणी करण्यात आली आहे. यातील काही लोक वृद्ध तर रक्तदाब आणि मधुमेहाचे रूग्णही होते. या सर्वांनची तपासणी करण्यात येणार आहे. गायब असलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्ती धारावीत असून कोरोना पॉझिटिव्ह सापडली आहे. या भीतीने यांनी पलायन केल्याच समोर येत आहे.
एका बाजूला कोरोनोचा धोका वाढतोय असं वाटत असतानाच दिलासा देणारी बाब समोर आली आहे. एकाच दिवशी सर्वाधिक रूग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. एकाच दिसात कोरोनाचे १४०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत राज्यभरात ११ हजार ७२६ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या ४१ हजार ६४२ झाली आहे. गुरुवारी २३४५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात सध्या २८ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.