मुंबई : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, अशी टीका अभाविपने केली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी तडजोड होता कामा नये, असं निवेदन अभाविपने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी ८ मे रोजी पत्रकार परिषद घेतली आणि फक्त शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होईल. कोरोनाचं संकट कमी झालं नाही तर २० जून रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत निर्णय होईल, असं सांगितलं होतं. पण अचानक उदय सामंत यांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना ग्रेड देऊन पास करावं, अशी मागणी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (युजीसी) केली. शिक्षणमंत्र्यांच्या या मागणीमुळे त्यांनी आपल्याच भूमिकेला छेद दिला. या मागणीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम तयार झाला आहे, अशी टीका अभाविपने केली आहे.
शिक्षणमंत्र्यांच्या या आत्मघातकी निर्णयामुळे भविष्यात राज्याच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती आहे. या मागणीमुळे अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे कुलपती या नात्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लक्ष घालावे, अशी मागणी अभाविपने केली आहे.
उदय सामंत यांच्या सुरुवातीच्या घोषणेनंतर विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठीच्या तयारीला सुरुवात केली. पण उदय सामंत यांनी तज्ज्ञ समितीचा सल्ला न घेता परीक्षा रद्द करण्यासंदर्भातली मागणी केली. शिक्षणमंत्री गोंधळलेल्या अवस्थेत रोज वेगळे निर्णय घेत असल्याची टीका अभाविपने केली आहे.
सरकार परीक्षेच्या बाबतीत आत्मघातकी निर्णय घेणार नाही. तसंच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, यासाठी राज्यपालांनी लक्ष घालावं, असं निवेदन अभाविपने दिलं आहे.