'जिंकलेल्या जागेवर बोलायचं नाही', संजय राऊतांनी काँग्रेसला स्पष्ट सांगितलं, 23 जागा लढण्यावर ठाम

लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटपावरुन महायुतीत संघर्ष होण्याची शक्यता आहे. याचं कारण ठाकरे गटाने आपण 23 जागा लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना टोला लगावला आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 29, 2023, 10:51 AM IST
'जिंकलेल्या जागेवर बोलायचं नाही', संजय राऊतांनी काँग्रेसला स्पष्ट सांगितलं, 23 जागा लढण्यावर ठाम title=

लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटपावरुन महायुतीत संघर्ष होण्याची शक्यता आहे. याचं कारण ठाकरे गटाने आपण 23 जागा लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. खासदार संजय राऊत यांनी आपण 23 जागांवर ठाम असल्याचं आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना टोला लगावत दिल्लीत चर्चा सुरु असून, येथील गल्लीतील लोक बोलल्यास कोण ऐकणार? असं म्हटलं आहे. तसंच वंचितसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. 

"काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांशी आमची चर्चा सुरु आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी, वेणुगोपाल, खर्गे यांच्याशी आमच्या पक्षाची, उद्धव ठाकरेंची चांगल्या प्रकारे संवाद सुरु आहे. आम्ही किती जागा लढणार ही चर्चा दिल्लीत होईल.  येथील गल्लीतील लोक बोलल्यास कोण ऐकणार?आम्ही 23 जागा लढत आले असून, ती कायम ठेवू असंच म्हणालो आहोत," असं संजय राऊत म्हणाले आहेत. काँग्रेसने महाराष्ट्रात एकही जागा जिंकली नसून, त्यांना शून्यापासून सुरुवात करायची आहे असंही ते म्हणाले. 

"नाना पटोले कोण आहेत? जे बोलत आहेत त्यांच्याकडे काय अधिकार आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे मुंबईत असतात, त्यामुळे आमच्यात संवाद आहे. काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत आहे, आम्ही दिल्लीत बोलू. काल आमची दिल्लीत, महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नेत्यांशी आमची चर्चा झाली. आमची भूमिका स्पष्ट आहे. मी आजच बोलत नाही आहे," असं संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं. 

"आम्ही 23 जागांवर लढलो होतो आणि 18 जागा जिंकल्या होत्या. संभाजीनगरची जागा फार थोड्या फरकाने हारलो होतो त्यामुळे 19 झाल्या. शिरुरची जागी आम्ही लढली तिथे आता राष्ट्रवादीचा खासदार आहे. आम्ही जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही, चर्चा करायची नाही हे धोरण ठरलं आहे. काँग्रेसने महाराष्ट्रात जागा जिंकल्याच नव्हत्या. पण जिथे काँग्रेसची ताकद आहे, जिंकू शकतात, मदत होऊ शकते तिथे ते सोबत राहणारच आहेत. यावर दिल्लीचं हायकमांड आणि आमचं एकमत झालं आहे. त्यामुळे त्यावर जर राज्यातील कोणी बोलत असेल तर गांभीर्याने पाहण्याची गरज नाही," असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं. 

"उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यात उत्तम संवाद आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि दिल्लीत खर्गे, राहुल गांधी, वेणुगोपाल यांच्यात चांगला संवाद आहे. आम्ही काय करायचं ते पाहू," असंही ते म्हणाले.

"वंचितसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. उद्धव ठाकरे, शरद पवारांचं म्हणणं आहे की, वंचित आघाडीचा कोअर सोबत असायला हवा. काँग्रेसचीही त्याला मान्यता आहे. प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व महाराष्ट्रात आहे. त्यांची भूमिका हुकूमशाही नष्ट करावी अशीच आहे. ते आणि आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिकाच मांडत आहोत," असं संजय राऊत यांनी सांगितलं.  2024 मध्ये आम्ही परिवर्तन करुन दाखवू असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

अयोध्या राम मंदिराच्या निमंत्रणासंबंधी ते म्हणाले की, "आम्ही आमंत्रणाची वाट पाहत बसलेलो नाहीत. तो भाजपाचा कार्यक्रम आहे. तो 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीचा कार्यक्रम नाही. हा पक्षीय कार्यक्रम आहे. राष्ट्रीय कार्यक्रम असता तर आम्ही लक्ष घातलं असतं. त्यांना झेंडा फडकवू द्या, फोटो काढू द्या. आमचं काही म्हणणं नाही, राम सर्वांचे आहेत. असं राजकारण पाहून रामाच्या आत्म्याला त्रास होईल आणि पुन्हा वनवासात जातील असं कृत्य करु नका". 

'राहुल गांधींमध्ये पंतप्रधान होण्याचे सर्व गुण'

"राहुल गांधी लोकप्रिय नेते आहेत. राहुल गांधी संपूर्ण देशाला भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जोडत आहेत. राहुल गांधींकडे चेहरा आहे. त्यांचा संघर्ष सुरु आहे. लोकांना असा संघर्ष करणारा नेता आवडतो. ते खोटं बोलत नाहीत, प्रामाणिक आहेत, देशभक्त आहेत. पंतप्रधान होण्यासाठी अजून कोणते गुण हवेत. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना तसं वाटत असल्यास काही चुकीचं नाही. पण इंडिया आघाडी एकत्र काम करत असल्याने युतीचा चेहरा कोण आहे हे ठरवू," असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.