HDFC चा लोन रिकव्हरी एजंट नातेवाईकाच्या कर्जासाठी मला त्रास देतोय; बँकेने काय उत्तर दिलं पाहा, 'तुम्हाला...'

HDFC चा एजंट फक्त मानसिक त्रास देत नसून माझे वडील आणि आजोबांना फोन करुन आक्षेपार्ह भाषेत संवाद साधत असल्याची तक्रार त्याने केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 29, 2023, 09:51 AM IST
HDFC चा लोन रिकव्हरी एजंट नातेवाईकाच्या कर्जासाठी मला त्रास देतोय; बँकेने काय उत्तर दिलं पाहा, 'तुम्हाला...' title=

नातेवाईकाने घेतलेल्या कर्जासाठी बँकेचे लोन रिकव्हरी एजंट मला त्रास देत असल्याची तक्रार मुंबईतील एका व्यक्तीने केली आहे. एक्सच्या माध्यमातून त्यांनी आपलं गाऱ्हाण मांडलं आहे. यश मेहता यांनी आपला नातेवाईक एचडीएफसी बँकेचे हफ्ते भरण्यास असमर्थ ठरल्याने आपल्याला धमकी देणारे फोन केले जात असल्याचा आरोप केला आहे. बँकेची एंजट जिने आपली ओळख नेहा अशी सांगितली आहे, ती फक्त आपल्याला त्रासच देत नसून वडील आणि आजोबांना फोन करुन आक्षेपार्ह भाषेत संवाद साधत असल्याचाही दावा आहे. एचडीएफसी बँकेने या तक्रारीची दखल घेतला असून, आपण या प्रकरणी तपास करत असल्याची माहिती दिली आहे. 

"कोणीतरी EMI घेतला, आणि कर्ज वसूल करण्यासाठी, HDFC बँक त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना कॉल करत आहे, आणि मी त्यापैकी एक आहे," असं यश मेहता यांनी X वर लिहिलं आहे. एजंटला आपल्या सर्व ठिकाणांची माहिती असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

“एजंटने मला धमकी दिली की ती माझ्या वडिलांना आणि आजोबांना फोन करेन, ज्यांचा ईएमआय घेतलेल्या व्यक्तीशी कोणताही संबंध नाही. त्या व्यक्तीकडे मी कुठे काम करतो यासह माझ्या सर्व ठिकाणांचे तपशील आहेत. माझा त्या व्यक्तीशी संबंध नसताना माझ्या गोपनीयतेचा भंग करण्याचा अधिकार HDFC बँकेला कोणी दिला आहे?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे. 

यश मेहता यांनी पोस्टमध्ये एचडीएफसी बँकेला टॅग केलं आहे. पुढे लिहिलं आहे की, “कृपया याची दखल घ्यावी. आमचा काहीही संबंध नसताना त्या एजंटने  माझ्याशी आणि माझ्या वडिलांशी कोणत्या भाषेत संवाद साधला याची रेकॉर्डिंगसह मी आरबीआयकडे तक्रार दाखल करत आहे. फोन करणार्‍या व्यक्तीने स्वतःची ओळख नेहा म्हणून दिली आहे, जे खोटे नाव आहे”. यश मेहता यांनी ट्विटरमध्ये स्क्रीनशॉटही जोडला आहे. 

एचडीएफसी बँकेने घेतली दखल

पोस्ट व्हायरल झाल्यानंतर एचडीएफसी बँकेने माफी मागत याप्रकरणी वेगाने तपास करण्याचं आश्वासन दिलं आहे. "हाय यश...तुम्हाला आमच्यासोबत आलेल्या या अनुभवाबद्दल आम्ही माफी मागतो. आम्ही तुमच्याशी संवाद साधत त्याची दखल घेतली आहे. याप्रकरणी तपास ही आमची प्राथमिकता आहे. कृपया आम्हाला यावर तोडगा काढण्यासाठी वेळ द्यावा," असं बँकेने म्हटलं आहे.

यश मेहता यांनी कमेंटमध्ये कर्जाची रक्कम 3,500 रुपये होती हे सांगत बँकेने 16 जानेवारी 2024 पर्यंत समस्येचे निराकरण करण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान 24 डिसेंबरला करण्यात आलेली ही पोस्ट व्हायरल झाली असून, अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी यावर आपल्याला आलेले असे अनुभव शेअर केले आहेत.