महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतील निकालाने महायुतीची चिंता वाढवली आहे. जर मतदारांचा कौल असाच राहिला तर विधानसभा निवडणुकीतही महायुतीसाठी धक्कादायक निकाल लागू शकतो. यामुळे आतापासून सर्व पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. शिंदे गटानेही लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे अनेक आमदार आणि खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. झी 24 तासच्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे.
"आमदारच नाही तर अनेक खासदारही आमच्या संपर्कात आहेत असं तुम्हाला सांगितलं तर धक्का बसेल," असं संजय राऊत म्हणाले. यावर आता निवडून गेलेले खासदार आहेत का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले, "हो आहेत ना, तुम्हाला धक्का बसेल. तुम्ही विश्वास ठेवणार नाही. मी नावं कशासाठी सांगू. आमच्या, त्यांच्या पक्षात काही निर्णय होऊ द्या. हा धोरणात्मक निर्णय असतो. महाराष्ट्राचं राजकीय चित्र बदलत आहे. मोदींचं सरकार हे आळवावरंच पाणी आहे हे सर्वांनाच माहिती आहे," अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
दरम्यान आज संध्याकाळी शिंदे गटाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. 4 वाजण्याच्या सुमारास शिवसेनेच्या सर्व नेत्यांची, आमदारांची आणि विधानपरिषदेच्या सदस्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. यावेळी विधानसभेच्या 288 जागांचा आढावा घेण्यात येणार आहे.
दुसरीकडे ठाकरे गटाचे 2 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते नरेंद्र मोदींना पाठिबा देणार आहेत असा दावा ठाण्यातील नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. ते म्हणाले आहेत की, "नवनिर्वाचित 2 खासदारांनी संपर्क साधलेला आहे. त्यांना उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका पटत नाही. आपल्या मतदारसंघात विकासकामं व्हायला हवीत, तसंच शिवसेनेच्या मूळ तत्वापासून जे बाजूला गेले आहेत, मशिदी, प्रार्थनास्थळं येथून देण्यात आलेले आदेश त्यांना पटलेले नाहीत. भविष्याच्या दृष्टीने शिवसेना आणि शिवसेनेची तत्वं यासाठी 2 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला आहे".