भाजपशी युती केली असती तर स्वबळाच्या भूमिकेला तडा गेला असता- शिवसेना

शिवसेना आणि भाजपची युती तुटणार का?

Updated: Dec 28, 2018, 04:12 PM IST
भाजपशी युती केली असती तर स्वबळाच्या भूमिकेला तडा गेला असता- शिवसेना title=

मुंबई: अहमदनगर महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीमुळे शुक्रवारी महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापताना दिसले. याठिकाणी शिवसेनेकडे सर्वाधिक नगरसेवक असतानाही भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने महापौरपदाची निवडणूक जिंकली. यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला आहे. भाजपकडून या निवडणुकीची सूत्रे हलवणाऱ्या गिरीश महाजन यांनी शिवसेनेने युतीसाठी पुढाकार घेतलाच नाही, असे सांगितले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, आम्ही भाजपशी युती केली असती तर स्वबळावर लढण्याच्या आमच्या भूमिकेला तडा गेला असता. परंतु, या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील साटेलोटे पुन्हा उघड झाल्याचे सेनेने म्हटले. तसेच या निवडणुकीत मतांसाठी पैशांचा मोठ्याप्रमाणावर घोडेबाजार झाल्याचा दावाही शिवसेनेने केला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही शिवसेनेच्या भूमिकेची री ओढली आहे. या निवडणुकीत स्थानिक नेत्यांनी परस्पर भाजपशी युती केल्याचे पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, शिवसेनेच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले की, आम्हालाही शिवसेनेशी युती करायची होती. मात्र, शिवसेनेने आम्हाला विचारलेच नाही. परिणामी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली. ही युती केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करण्याबाबत म्हणाल तर नगर जिल्हा परिषद व इतर ठिकाणी शिवसेनेनेही राष्ट्रवादीशी युती केल्याचे गिरीश महाजन यांनी लक्षात आणून दिले. दरम्यान, आगामी निवडणुकीत या सगळ्या घडामोडींमुळे शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे लढणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे १४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ नगरसेवक निवडून आले होते. तर २४ जागा मिळवत शिवसेना सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. पालिकेत एकूण ६८ जागा असून बहुमतासाठी ३५ चे संख्याबळ आवश्यक होते. पण दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये असलेल्या वादामुळे ही युती प्रत्यक्षात येऊ शकली नाही. तसेच महापौरपद शिवसेनेला दिले तर भाजपा फक्त उपमहापौरपदावर समाधानी नव्हती. भाजपाची नजर स्थायी समितीवरही होती.