पुणे : कोरेगाव भिमामध्ये यंदा १ जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेतलीय. याच पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी शिव प्रतिष्ठानचे नेते संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केलीय. गेल्या वर्षी १ जानेवारी रोजी कोरेगाम भिमा हिंसाचारात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावरही आरोप झाले होते. त्यामुळे या सर्व आरोपींवर विविध कलमान्वये पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिलीय. यानुसार, ३० डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना २ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आलीय. ते पुणे शहरात राहू शकतील परंतु, पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येण्यास मात्र त्यांना मनाई करण्यात आलीय.
१ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव भीमाच्या लढाईत ८०० दलितांनी इंग्रजांकडून लढत बाजीराव पेशव्यांच्या २७ हजार सैनिकांना हरवलं होतं. हाच दिवस 'विजय दिवस' मानत दरवर्षी हजारो नागरिक कोरेगाव भिमाजवळच उभारल्या गेलेल्या 'विजय स्तंभाला' अभिवादन करण्यासाठी जमतो. १ जानेवारी २०१८ रोजी विजय दिवसाला २०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानंही दरवर्षीप्रमाणे हजारो नागरिक 'विजयस्तंभा'ला अभिवादन करण्यासाठी जमले होते. त्यावेळी या जमावावर काही समाज कंटकांकडून अचानक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात राहुल फटांगडे या तरुणाला आपला जीवही गमवावा लागला होता.
या हिंसाचारानंतर प्रथम भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी केली होती. दलित समाजाविरोधात हिंसा भडकावण्याचा आरोप आंबेडकरांनी केला होता. त्यानंतर कोरेगाव भिमाचा हिंसाचार हा सुनियोजित कट असल्याचं सांगत ३० डिसेंबर २०१७ रोजी परिसरातील सोनई हॉटेलमध्ये मिलिंद एकबोटे यांनी बैठक घेतल्याचा आरोप सत्यशोधन समितीने केला होता. या हिंसाचाराचे पडसाद पुढचे कित्येक दिवस महाराष्ट्रभर उमटताना दिसले या सर्व पार्श्वभूमीवर एकबोटे-भिडेंवरील ही कारवाई महत्त्वाची मानली जातेय.