मुंबई : शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Birth Anniversary) यांची आज (23 जानेवारी) 96 वी जयंती. शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्ताने अनेक शिवसैनिकांनी स्मृतिस्थळावर येऊन त्यांच्या स्मृतिला अभिवादन केलं. बाळासाहेबांनी अनेक कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक तयार केले. शिवसेनाप्रमुखांचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात आहे. अशाच एका शिवसैनिकाने शिवसेनाप्रमुखांचं जमीन विकून मंदिर उभारलंय. (shivsainik sanjay itagyalkar in mukhed taluka of nanded sold land and built a temple of late shivsena chief balasaheb thackeray)
मराठवाड्यातील एका शिवसैनिकाने जमीन विकून स्वखर्चातून हे मंदिर उभारलंय. नांदेडमधील मुखेड तालुक्यामधील इटग्याळ गावात बाळासाहेबाचं हे मंदिर आहे. संजय इटग्याळकर या तरुणाने त्याच्या हिश्याला आलेली वडिलोपार्जित जमीन विकून हे मंदिर उभारलं आहे.
संजय हा अल्पभूधारक शेतकरी आहे. संजयने कला शाखेतून पदवी शिक्षण पूर्ण केलंय. संजयवर लहानपणापासूनच बाळासाहेबांच्या विचारांचा पगडा होता. बाळासाहेबांचे विचार त्याला पटायचे. पदवी शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी आणि बाळासाहेबांना आणखी जवळून अनुभवता यावं, यासाठी संजय मुंबईत आला.
संजयने यानंतर मुंबईतील पश्चिम उपनगरातील अंधेरीतील जानकी देवी पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षण देण्याचं काम केलं. या दरम्यान त्याने शिवसैनिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
आदित्य ठाकरेंकडून भेट
दरम्यान आदित्य ठाकरे यांनी 2019 मध्ये बाळासाहेबांच्या पुतळ्याची पाहणी केली होती. आदित्य ठाकरे 2019 मध्ये नांदेड दौऱ्यावर असताना त्यांनी पुतळ्याच्या ठिकाणी भेट दिली होती.
पुतळा उभारण्यामागचा हेतू काय?
बाळासाहेबांची आठवण आणि त्यांच्या विचारांची ज्योत कायम तेवत राहावी, या उद्देशाने शिवसेनाप्रमुखांचं मंदिर उभारलंय, अशी प्रतिक्रिया संजयने दिली. सध्या संपूर्ण जिल्ह्यात हे मंदिर आकर्षणाचा विषय ठरला आहे.