Vidhan Parishad Election: जयंत पाटलांच्या पराभवानंतर शिवसेनेचा आमदार चिखलात लोळला, समर्थकांसह केला आनंदोत्सव

विधानपरिषद निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) पुरेशी मतं नसतानाही तिसरी जागा लढवली होती. जयंत पाटील यांना शरद पवार गटाने (Sharad Pawar Faction) पाठिंबा जाहीर केला होता.   

शिवराज यादव | Updated: Jul 13, 2024, 06:26 PM IST
Vidhan Parishad Election: जयंत पाटलांच्या पराभवानंतर शिवसेनेचा आमदार चिखलात लोळला, समर्थकांसह केला आनंदोत्सव title=

विधानपरिषद निवडणुकीत (Maharashtra Legislative Council Election) महायुतीने (Mahayuti) सर्वच्या सर्व 9 जागा जिंकत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. प्रज्ञा सातव आणि मिलिंद नार्वेकर असे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) 2 उमेदवार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीने पुरेसं संख्याबळ नसतानाही तिसरी जागा लढवणं महागात पडलं. शरद पवार गटाने पाठिंबा दिलेले शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) यांचा या निवडणुकीत पराभव झाला. या सर्व घडामोडीत काँग्रेसची सहा ते सात मतं फुटली असा अंदाज आहे. दरम्यान जयंत पाटील यांच्या पराभवानंतर शिवसेनेने आगळावेगळा आनंद साजरा केला. 

शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या पराभवानंतर शिवसेना शिंदे गटाने आगळावेगळा आनंदोत्सव साजरा केला. आमदार महेंद्र दळवी स्वतः जल्लोषात सहभागी झाले होते. त्यांनी समर्थकांसह चिखलात लोळत आनंद व्यक्त केला आहे. महेंद्र दळवी हे शिवसेना शिंदे गटाचे अलिबागचे आमदार आहेत. 

महेंद्र दळवी समर्थकांसह भर पावसात तलावात उड्या  मारून पोहत तसंच चिखलात लोळत आनंद साजरा करीत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. आमदार महेंद्र दळवी यांनी जयंत पाटलांच्या पराभवाचे भाकीत केले होते. हे भाकीत खरे ठरल्यानंतर त्यांनी समर्थकांसह चिखलात लोळत, पाण्यात उड्या मारत त्यांनी आनंद साजरा केला. 

जयंत पाटील यांना 12 मतंच मिळाली

शेकापचे जयंत पाटील यांना शरद पवार गटाने पाठिंबा जाहीर केला होता. जयंत पाटील यांनी अन्य मतं मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांना शरद पवार गटाची 12 आणि शेकापचं 1 मत मिळणं अपेक्षित होतं. पण त्यांना पहिल्या पसंतीची 12 मतंच मिळाली. 

अजित पवार गटाला 5 मतं जास्त

11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात असल्याने चुरस निर्माण झाली होती. या निवडणुकीत भाजपाचे 5, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे प्रत्येकी 2 आणि ठाकरे गटाचा 1 उमेदवार निवडून आला. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला अपयश आलं होतं. यानंतर अजित पवार गटातील आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. त्यामुळे त्यांची मतं फुटतील अशी शक्यता व्यक्त केली होती. पण अजित पवार गटाला संख्याबळापेक्षा 5 मतं जास्त मिळाली आहेत.