राज्यातील शिंदे सरकार हे अवकाळी सरकार! वज्रमूठ सभेत विरोधकांचा हल्लाबोल

राज्यात शिंदे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांवर संकटा मागून संकटे येत आहेत, धार्मिक मुद्दे पुढे करुन जनतेचे मुद्दे टाळले जात आहेत असा हल्लाबोल नागपूरमध्ये पार पडलेल्या वज्रमूठ सभेत करण्यात आला.

Updated: Apr 16, 2023, 10:48 PM IST
राज्यातील शिंदे सरकार हे अवकाळी सरकार! वज्रमूठ सभेत विरोधकांचा हल्लाबोल title=

Mahavikas Aghadi Sabha : देशात लोकशाही आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. सत्तेवर बसलेल्या लोकांच्या मित्रांच्या फायद्यासाठी लोकशाहीचा वापर केला जात आहे. यांच्या मित्रांचे नंबर श्रीमंतीत वर जात आहे तर जनतेचा नंबर मात्र खाली खाली जात आहे.लोकशाहीच्या मार्गाने देश चालण्यासाठी ज्या माणसाने संविधान दिले त्याचे रक्षण आम्ही करु शकत नाही का? घटना बचाव नाही तर घटनेचे रक्षण मीच करणार अशी म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली.

राज्यात शिंदे सरकार (Shinde Government) आल्यापासून शेतकऱ्यांवर संकटा मागून संकटे येत आहेत. राज्यातील सरकार हे अवकाळी सरकार आहे. आमचे सरकार असताना शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली आता मात्र पंचानाम्याचे करत बसले आहेत. मी काँग्रेसबरोबर गेलो म्हणजे हिंदुत्व (Hindutwa) सोडले असा आरोप करता, काँग्रेसवाले हिंदू नाहीत का? आमचे हिंदुत्व शेंडी जाणव्याचे नाही. यांचे हिंदुत्व गोमुत्रधारी आहे. सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) मशिदीत जाऊन आले, मी मशिदीत जाऊन आलो असतो तर किती गोंधळ घातला असता. मशिदीत जाऊन हे कव्वाली गाणार. देशात व राज्यात आज जो कारभार सुरु आहे तो रा. स्व. संघाला मान्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

ही लढाई तुमच्यासाठी सुरु आहे, यात तुमचा सहभाग महत्वाचा आहे, तुमची साथ असेल तर आता जिंकेपर्यंत थांबायचे नाही. धार्मिक मुद्दे पुढे करुन जनतेचे मुद्दे टाळले जात आहेत. लोकशाही मेली नाही मरु देणार नाही असा निर्धार करा आणि आगामी निवडणुकीत भाजपाला (BJP) घरी बसवा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. 

मविआची वज्रमूठ सभा
महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा (Vajramoot Sabha) नागपूरमध्ये पार पडली. यावेळी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, माजी मंत्री सुनिल केदार, विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी नेते उपस्थित होते.

शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, जाहीरातीवर खर्च - नाना पटोले
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्यामागे अवकाळी पाऊस लागला असून शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालं. पण हे सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही. गारपीट झाली, शेतकरी ढसाढसा रडतोय त्याला मदत देत नाही. दुसरीकडे जाहीरातींवर मात्र कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, अशी टीका  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे सरकारच्या चुकीच्या धोणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दहापटिने वाढल्या आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी चुकीचे पाऊल टाकू नये असे आवाहन करत आगामी निवडणुकीत भाजपाचा पराभव करून त्यांची जागा दाखवा, असंही नाना पटोले म्हणाले.

नागपूर हे देशातील सर्वात महागडं शहर आहे, या शहरात जे काही आणले जात आहे ते कर्जाने आणले आहे आणि नागपूरच्या लोकांना लुटलं जात आहे. विकासाच्या नावाखाली लुटण्याचं काम सुरु आहे. ऑऊट सोर्सिंगच्या माध्यमातून सरकारी नोकर भरती करण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन असते पण ऑऊट सोर्सिंगमुळे जनतेला न्याय मिळणार नाही. पुलवामा स्फोटात वापरलेली स्पोटके नागपूरमधून गेली पण त्याचा छडा अद्याप लावला जात नाही. शेतकरी, तरुण, व्यापारी यांना बरबाद करण्याचे तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपुष्टात आणण्याचे काम सुरु आहे असा आरोप पटोले यांनी केला. 

40 जवानांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 
तर देशाच्या पंतप्रधानांवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत पण ते कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देत नाहीत. अदानी राजकीय आशिर्वादानेच देशातील दुसऱ्या नंबरचा श्रीमंत व्यक्ती झाला. अदानी-मोदी संबंधावर भाजपा किंवा मोदींनी अद्याप उत्तर दिले नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अतिशय गंभीर आरोप केले. 14 फेब्रुवारी 2019 मध्ये 40 जवान शहिद झाले. पण त्यावर सत्यपाल मलिक यांना गप्प बसण्यास सांगण्यात आलं. 300 किलो स्फोटके असलेली वाहन फिरत होती, स्फोट झाला आणि 40 जवानांचा मृत्यू झाला याला जबाबदार कोण? याचे उत्तर मिळाले पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 

देशात जे घडत आहे त्याकडे दुर्लक्ष केले तर ते परवडणारे नाही. महाविकास आघाडीची वज्रमूठ भक्कम ठेवून भाजपाला घरी बसवण्याचा निर्धार करा आणि आगामी निवडणुकीत भाजपा व मोदींना घरी बसवा, असं आवाहनही पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं.

राज्य सरकारने फक्त सुडाचं राजकारण केलं - जयंत पाटील
नागपूर ही क्रांतीकारकांची भूमी आहे, नागपुरमध्ये जे ठरते त्याचा संदेश देशात जातो. विदर्भातील शेतकऱ्यांची आणि सामान्य जनतेची वज्रमुठ शिंदे सरकारला विचारत आहे की 10 महिन्यात काय दिले? अवकाळी संकटाने झालेली नुकसानभरपाई दिली नाही. या सरकारने फक्त सुडाचे राजकारण दिले, विरोधकांना शत्रु मानण्याचे काम सध्या सुरु आहे.जे त्यांच्यासोबत जात नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जात आहे अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. 

या सरकारने मविआ सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याचे काम केले. विरोधी बोलणाऱ्यावर कारवाई करणे हेच या सरकारचे काम आहे. हे बहुजनांचे सरकार नाही. शिंदे सरकार घाबरले आहे म्हणून निवडणुकाही घेत नाही. हिम्मत असेल तर मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान पाटील यांनी दिले.