बंडानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार येणार एकाच व्यासपीठावर, कधी आणि कुठे? जाणून घ्या

Narendra Modi Sharad Pawar: लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टने (Lokmanya Tilak Smarak Trust) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. हे या पुरस्कार सोहळ्याचं 41 वं वर्ष असून, लोकमान्य टिळक (Lokmaya Tilak) यांची 103 वी पुण्यतिथी आहे. 1 ऑगस्ट 2023 ला पुण्यात हा कार्यक्रम पडणार आहे. या कार्यक्रमात शरद पवारही (Sharad Pawar) उपस्थित असणार आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jul 11, 2023, 06:06 PM IST
बंडानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार येणार एकाच व्यासपीठावर, कधी आणि कुठे? जाणून घ्या title=

Narendra Modi Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) बंडानंतर राज्यातील राजकारण सध्या तापलं आहे. बंडाच्या निमित्ताने काका शरद पवार (Sharad Pawar) आणि पुतण्या अजित पवार (Ajit Pawar) आमने-सामने असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजपानेच अजित पवारांना फूस लावून बंड घडवल्याचा आरोप केला जात आहे. शरद पवारांनी या बंडानंतर भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या बंडाचे पडसाद अद्यापही उमटत असतानाच शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादीतील बंडानंतर पहिल्यांदाच दोन्ही दिग्गज नेते एकत्र येणार असल्याने सर्वांचं याकडे लक्ष असेल. 

नरेंद्र मोदींचा सन्मान

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टने (Lokmanya Tilak Smarak Trust) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी सोमवारी यासंबंधी घोषणा केली. हे या पुरस्कार सोहळ्याचं 41 वं वर्ष असून, लोकमान्य टिळक (Lokmaya Tilak) यांची 103 वी पुण्यतिथी आहे. 1 ऑगस्ट 2023 ला पुण्यात हा कार्यक्रम पडणार आहे. या कार्यक्रमात शरद पवारही (Sharad Pawar) उपस्थित असणार आहेत. राष्ट्रवादीमधील बंडानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि नरेंद्र मोदी आमने-सामने असतील. 

रोहित टिळक यांनी सांगितलं आहे की, शरद पवार या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमात नरेंद्र मोदींना सन्मानित केलं जाणार आहे. अशावेळी दोन्ही नेते आपल्या भाषणात कोणते विचार मांडतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल. 

इतकंच नाही तर या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेही उपस्थित असणार आहेत. म्हणजेच सध्या बंडामुळे आमने-सामने असणारे काका पुतण्याही एकत्र येणार आहेत. 

मोदींचा सन्मान का? 

"आत्मनिर्भर भारत मिशनअंतर्गत देशाने अनेक गोष्टी मिळवल्या आहेत. या मोहिमेमुळे देशाप्रती जागरुकता आणि प्रेम वाढलं आहे. आत्मनिर्भर भारताने प्रगतीच्या पायऱ्या चढण्यात मदत केली आहे. तसंच देशातील नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागवण्यासाठी आणि जागतिक स्तरावर उंची वाढवल्याबद्दल हा पुरस्कार दिला जात आहे," असं रोहित टिळक यांनी सांगितलं आहे. .

काँग्रेस नाराज

दरम्यान, पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस नाराज आहे. पुणे काँग्रेसने राहुल गांधींकडे आपला आक्षेप नोंदवत हा मुद्दा मांडला. मोदींची विचारधारा लोकमान्य टिळकांच्या विचारधारेपासून फार दूर आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे, रोहित टिळक पुणे काँग्रेसचा भाग आहेत. ते कसबामधून निवडणूकही लढले आहेत. 

याआधी दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.