ग्राहकांपर्यंत जिवंत, ताजे मासे पोहोचवतात हे तरुण

पाहा हा स्पेशल रिपोर्ट

Updated: Dec 18, 2019, 07:33 PM IST
ग्राहकांपर्यंत जिवंत, ताजे मासे पोहोचवतात हे तरुण  title=

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : मासे.... म्हणजे अनेकांच्या आवडीचं खाद्य. ताटात वाढलेल्या जेवणामध्ये मांसाहाराची ही मेजवानी असली की पोटात चार घास जास्त जातात असं म्हणणारेही अनेक आहेत. पण, अनेकदा आपल्यापर्यंत येणारे मासे हे नेहमीच ताजे असतील असं नाही. त्यामुळे हीच बाब लक्षात घेत महाराष्ट्रातील सातारा येथे काही तरुणांनी नामी शक्कल लढवली आहे. 

साताऱ्यातील चिंचणी गावातील तरुणांनी एकत्र येऊन एक नामी शक्कल लढवली आहे. गावातल्या गावात जिवंत मासे विकण्याचा अनोखा व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे. साताऱ्यातील कण्हेर धरणात काही तरुण गेल्या तीन वर्षांपासून श्री वरदायनी माता मत्स्य प्रकल्प चालवत आहेत. सुरुवातीला त्यांना य़ात म्हणावा तसा फायदा झाला नाही, मग त्यांनी आयडियाची कल्पना लढवली.

एक चार चाकी गाडी घेत त्यात पाण्याची टाकी ठेवून त्यात जिवंत मासे आणायला सुरुवात केली. हे तरुण माशांसाठी खाद्य घेऊन बोटीनं कण्हेर धरणातल्या मत्स्य प्रकल्पाच्या ठिकाणी जातात. तिथून  पूर्ण वाढ झालेल्या माशांना छोट्या छोट्या बॅरेलमधून जिवंत घेऊन येतात आणि वाहनांमधून ते ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचतात. त्यांनी आणलेले मासे विकत घेण्यासाठी आयाबायांचा गराडा पडतो. मासळी बाजारात न जाता घरच्या घरीच जिवंत मासे मिळत असल्यानं ग्राहकही खूश आहेत आणि हा व्यवसाय करणारे तरुणही. 

आजमितीस तब्बल ६ वाहनांमधून सातारा शहर आणि आजुबाजूच्या परिसरात दिवसाकाठी १५० ते २०० किलो मासे हे तरुण विकतात. त्यातून त्यांना चांगलं उत्पन्नही मिळतं. सध्या बासा प्रजातीच्या माशांचं उत्पादन ते करतात. भविष्यात ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन, आणखी वेगळ्या प्रजातीचे मासे ते उपलब्ध करून देणार आहेत. तेव्हा आता त्यांचा हा व्यवसाय साताऱ्यात तर यशस्वी ठरला, यापुढे ते व्यवसायाच्या कक्षा रुंदावणार का, हे पाहणंही महत्त्वाचं असेल.