मुंबई : Maharashtra Political Crisis : राज्यात राजकीय सत्तानाट्याला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेने थेट भाजपलाच इशारा दिला आहे. (Shiv Sena Crisis) शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी गंभीर इशारा दिला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागून सूत्र हलवित असल्याने ते मुंबई - दिल्ली वारी सातत्याने करीत आहेत, अशी जोरदार चर्चा आहे. यावरुन संजय राऊत यांनी फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. फडवणीस या फंद्यात पडू नका नाही तर पहाटेचा शपथविधी संध्याकाळी होईल, असे संजय राऊत म्हणाले.
जे काही सुरु आहे ते निपटायला शिवसेने समर्थ आहे. आमचे आम्ही बघून घेऊ. देवेंद्र फडणवीस तुम्ही या फंद्यात पडू नका, आमचा आम्ही बघून घेतो. स्वत:ची उरलीसुरलेली प्रतिष्ठा धुळीस मिळवू नका, असा इशारा वजा सल्ला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे. संजय राऊत हे मीडियाशी बोलत होते. आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे, त्या पार्श्वभूमीवर राऊत बोलत होते.
दरम्यान, शिवसेनेसाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. शिवसेना कुणीही हायजॅक करु शकत नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, हजारो शिवसैनिक माझ्या मागे आहेत, म्हणून मी उभा आहे. आजही उद्धव ठाकरे यांच्या मागे हजारो सैनिक आहेत. पक्षविस्तारासाठी आमच्याकडे मोठी संधी आहे. पैसा आहे म्हणून कुणीही काहीही करु शकत नाही, असा टोला भाजपला राऊत यांनी यावेळी लगावला.
जे बाहेर गेलेत त्यांनी मुंबईत येऊन बोलावे. बंडखोरांनी पलायन केले आहे. त्यांना जी सुरक्षा आहे, ती आमदार म्हणून आहे. ढुंगणाला पाय लावून पळालेल्यांच्या सुरक्षेच जबाबदारी आमची नाही. वाघ म्हणवता मग बकरीसारखे का वागता? राज्याबाहेर पळालेल्यांची सुरक्षेची जबाबदारी आमची नाही, असा हल्लाबोल राऊत यांनी यावेळी केला.
आमचेच पळून गेले. काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेच्या पाठिशी आहे. शिवसेनेचा अजून विसेफोट झालेला नाही. पक्षविस्तारासाठी आमच्याकडे मोठी संधी आहेत. पक्षात अनेक नियुक्त्या केल्या जातील, असे संकेत राऊत यांनी यावेळी दिली.