Maharashtra Political News : कॉंग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेनिमित्त (Bharat Jodo Yatra in Maharashtra) सध्या महाराष्ट्रात आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राज्यात नवं राजकारण सुरु झालं आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र यापासून फारकत घेतली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, आपण सावरकरांचा आदर करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन आघाडीमध्ये फूट पडू शकते असे म्हटले आहे.
"आपल्या देशात तक्रारी दाखल करणं आणि त्याच्याआधारे प्रसिद्धी मिळवणं हा राजकीय उद्योग झालाय. काल उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलय की, वीर सावरकरांची कोणत्याही प्रकारची बदनामी शिवसेना सहन करणार नाही. त्यामुळे हे सांगितल्यावर आमचा विषय संपतो. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महागाई, बेरोजगारी अशा विषयांवर त्यांची भारत जोडो यात्रा आहे. ही यात्रा सुरु असताना वीर सावरकरांचा विषय काढण्याची आवश्यकता नव्हती. यामुळे शिवसेनेसह कॉंग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. इतिहासात काय घडलं हे चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास घडवावा या मताचे आम्ही आहोत." राहुल गांधी यांनी त्याकडे लक्ष द्यावे, असे संजय राऊत म्हणाले.
"वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी भाजप नेते का उचलून धरत नाहीत? सावरकर हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्रद्धास्थान कधीच नव्हते असा इतिहास सांगतो. राजकारणासाठी त्यांनी हा विषय आणला आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून वीर सावरकरांच्या हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे," असेही संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा : बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला राहुल गांधींनी साधं फुलंही वाहिली नाही?
"महाराष्ट्रात येऊन सावरकरांवर आरोप करणे हे शिवसेनेला मान्य नाही. कॉंग्रेसचे नेतेही याचे समर्थन करणार नाहीत. हे बोलायची काही गरज नव्हती. भारत जोडो यात्रेत सावरकरांचा मु्द्दा आणायची गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते हे मी सांगत आहे. कारण आम्ही सावरकरांना श्रद्धास्थान मानतो," असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
"एकीकडे देशासाठी अवघ्या २४ व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी त्यांनी अनेकवेळा माफीची पत्रे इंग्रज सरकारला लिहिली," अशी टीका खासदार राहुल गांधी यांनी केली होती.