'सैराट'ची पुनरावृत्ती : सुमित वाघमारेचे मारेकरी अजूनही मोकाट

बुधवारी सुमित वाघमारेवर बालाजी लांडगे आणि त्याच्या मित्राकडून चाकू हल्ला करण्यात आला होता

Updated: Dec 20, 2018, 12:36 PM IST
'सैराट'ची पुनरावृत्ती : सुमित वाघमारेचे मारेकरी अजूनही मोकाट  title=

बीड : बहिणीला पळवून नेऊन लग्न केल्याचा राग मनात धरून बीडमध्ये सख्या मेव्हण्याची हत्या करण्यात आलीय. 'सैराट'सारख्या प्रकरणानं सध्या बीड शहर हादरुन गेलंय. खून झालेल्या सुमित वाघमारेच्या नातेवाईकांनी आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मृत सुमितच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बुधवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास बहिण भाग्यश्रीचा नवरा सुमित वाघमारेवर बालाजी लांडगे आणि त्याच्या मित्रानं चाकू हल्ला केला. त्यातच सुमितचा मृत्यू झाला.   

सुमितच्या नातेवाईक रात्रभर जिल्हा रुग्णालयात ठाण मांडून बसले होते. नातेवाईकांच्या आंदोलनानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी पोलिसांना यश आलं... पोलिसांच्या आश्वासनानंतर नातेवाईक वरमले... आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास सहमती दर्शवली.  आज सकाळी शवविच्छेदनानंतर सुमितचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

पोलीस अधिक्षक ई श्रीधर यांनी आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असं आश्वासन दिलंय. यासाठी पथकं रवाना करण्यात आलीत तसंच जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय. तसंच आरोपींच्या मोबाईल लोकेशन्स धुंडाळून काढली जात आहेत.  

बीडमध्ये 'सैराट'ची पुनरावृत्ती... 

बीडमधल्या गांधीनगर भागात असलेल्या आदित्य इंजिनिअरिंग महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या सुमित वाघमारे यानं दोन महिन्यांपूर्वी भाग्यश्री साबळे हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. या लग्नाला भाग्यश्रीचा भाऊ संकेत साबळे याचा विरोध होता. आपल्या बहिणीचे लग्न आपल्या मनाविरुद्ध झाले म्हणून संकेतनं अनेकदा गोंधळही घातला होता. 

बुधवारी १९ डिसेंबर रोजी सुमीत आपल्या पत्नीसह महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी आला होता. परीक्षा देऊन सुमीत बाहेर पडल्यानंतर संकेत याने आपल्या मित्रांसह सुमीतवर चाकूने हल्ला केला. चार - पाच जीवघेणे वार करून हल्लेखोर पसार झाले.